सामना अग्रलेख – विजय गर्जना!

देशाची लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान, जनतेचा आवाज बंदिवान होऊ नये असा संकल्प भारताच्या जनतेने आजच्या दिवशी करणे हाच विजयादशमीचा विजयोत्सव आहे. मुंबईच्या शिवतीर्थावर महाराष्ट्राच्या राजधानीतून हिंदुहृदयसम्राटांनी वर्षानुवर्षे हा विचारांचा वन्ही चेतवून देशाला जाग आणली. ‘महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा कणा ताठ ठेवा’, ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले’ या सेनापती बापटांच्या ज्वलंत मंत्राला पुढे नेले. महाराष्ट्र ज्वलंत आणि जिवंत आहे हे आजची शिवतीर्थावरील विजयादशमी दाखवून देईल.

आज विजयादशमीचा उत्सव आम्ही साजरा करीत आहोत. मोदी राज्यात फक्त उत्सवच सुरू असतात. राजा उत्सवात मग्न असतो आणि प्रजा मात्र तळमळत असते. त्यामुळे आजचा दसऱ्याचा उत्सव तरी वेगळा आहे काय? मराठवाड्यातील शेतकरी, त्यांची कुटुंबे अतिवृष्टीच्या हल्ल्यामुळे सर्वस्व गमावून चिखलपाण्यात तडफडत आहेत. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यात 26 अबलांचे कुंकू पुसले गेले. त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू सुकलेले नाहीत. लडाखमध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी आवाज उठविणाऱ्या राष्ट्रभक्त सोनम वांगचुक यांना सरकारने राष्ट्रद्रोही ठरवून तुरुंगात ढकलले आहे. मणिपुरातून धुराचे लोट आकाशात जाताना दिसत आहेत. बिहारसारख्या मोठय़ा राज्यात मतचोरी आणि निवडणूक आयोगाच्या शिरजोरीविरुद्ध जनता रस्त्यावर उतरली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते, भारतीय जनतेचा आवाज ठरलेले राहुल गांधी यांच्या छातीवर गोळ्या झाडायला हव्यात अशी उद्दाम भाषा केरळातील भाजप प्रवक्त्याने केली. त्या उद्दामपणावर संपूर्ण भाजप आजही शांत आहे. अशा असंख्य प्रश्नांनी, विचारांनी देशात प्रचंड खळबळ माजलेली आहे. एवढेच नव्हे, तर सर्व राजकीय पक्ष, सर्व हितसंबंधी व सर्व समाज घटक या सर्वांच्या मनामध्ये या प्रश्नांमुळे एक प्रकारची बेचैनी निर्माण झालेली आहे. एखाद्याने देशभर संचार करून जमिनीवरील भाजप कार्यकर्त्यांसह इतर जनतेच्या मुलाखती घेतल्या तर त्याला आढळून येईल की, देशातील मध्यमवर्गाच्या मनामध्ये कमालीचा असंतोष खदखदत आहे. तो असंतोष जातीधर्माच्या अंगारा-धुपाऱ्यात विरघळून टाकण्याचे कौशल्य सध्याच्या राज्यकर्त्यांनी जाणले आहे. जनतेच्या मनात असंतोषाचा वणवा पेटत असेल व जनता ऐकण्याच्या मनःस्थितीत नसेल तर राजा धर्माचा आधार घेतो. अब्राहम लिंकनने सांगितले आहे की, ‘जगाला कुणीच सदासर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही, पण राजकारणात घुसवलेला धर्म हे एक असे क्षेत्र आहे की, जेथे लोक पिढ्यान्पिढ्या मूर्ख बनत असतात.’ भारतात आज असा

मूर्खांचा जोर

वाढला आहे. हे मूर्ख असे की, त्यांच्यासाठी पहलगाममध्ये पाकिस्तानी हल्ल्यात बळी पडलेले 26 निरपराध हे दुःखाचे कारण नाही, तर पाकिस्तानवर क्रिकेटच्या मैदानावर मिळवलेला विजय हाच विजयोत्सव साजरा करण्याचे कारण आहे. यंदाच्या विजयादशमीवर पहलगामच्या भारतीय बळींचे सावट आहे. प्रत्येक विजयी संचलनावर पुसल्या गेलेल्या सिंदुराचे कण स्पष्ट दिसत आहेत. तो सिंदूर सर्व भारतीयांना जणू विचारीत आहे, ‘‘बाबांनो, आमचा बदला पूर्ण झाला का? बदल्याच्या बदल्यात पाकव्याप्त कश्मीर भारताला जोडण्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण झाले काय?’’ विजयादशमीच्या कथा, उपकथा या हिंदू धर्माचा आधार आहेत. भगवान श्रीरामांनी याच दिवशी रावणाचा वध केला. देवी दुर्गेने याच दिवशी महिषासुराचा वध केला. पांडवांनी अज्ञातवासात असताना शस्त्र शमीच्या झाडावर लपवली होती. विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडावरील शस्त्र परत काढून कौरवांवर विजय मिळवला. एकंदरीत काय तर हा हिंदू धर्मानुसार दसरा म्हणजे पापावर विजय मिळवण्याचा दिवस आहे. पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला तो काही ‘व्होट चोरी’ करून नाही. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला तो काही निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाची ढाल पुढे करून नाही. हे आजच्या युगातील रामभक्तांनी समजून घेतले पाहिजे, पण विचार करण्याची कुवत आज संपवून टाकली आहे. देशभरात जीवनमरणाच्या प्रश्नांनी घातलेले थैमान आणि राज्यकर्त्यांचे नकली हिंदुत्व यामुळे लोकांनी संतप्त व्हायला हवे. राज्यकर्त्यांवर प्रश्नांचा भडिमार करायला हवा. आमच्या कपाळावरचा पुसला गेलेला सिंदूर हा असाच वाया घालवणार का? भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच हाच आमच्या पुसल्या गेलेल्या सिंदूरचा बदला असेल तर राष्ट्रवादाच्या, हिंदुत्वाच्या गर्जना उगाच करू नका. क्रिकेटची मॅच हे युद्ध असेल तर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या गर्जना हा राजकीय खेळ होता काय? असे सवाल लोकांनी सत्ताधाऱ्यांना करायला हवेत, परंतु लोकांना आज हे प्रश्न पडत नाहीत. धर्माच्या बाबतीत चिंता करणारे देशाच्या प्रश्नांबाबत चिंता करत नाहीत. तशा

बधिरतेची व्यवस्था

मोदी-शहांच्या सरकारने केली आहे. ‘‘लोकांना इतके धार्मिक आणि धर्मांध बनवा की, ते आपली गरिबी, बेरोजगारीला दैवी देणगी, भाग्य समजतील,’’ असे थोर विचारवंत सआदत हसन मंटोने सांगितले ते भारतात तंतोतंत खरेच वाटत आहे. देशात बेरोजगारीचा रावण थैमान घालतो आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत मरण पावला आहे. मोदी सत्तेवर आले तेव्हा डॉलर रुपयाचा चरणदास बनेल अशी मजबूत अर्थव्यवस्था बनवू असे त्यांचे वचन होते. अर्धा देश गौतम अदानी यांना स्वस्तात किंवा फुकटात दिला आहे. देशाला भगतगिरीत गुंग ठेवून इतर लोक मौज करीत आहेत. भ्रष्टाचारी, व्होट चोर, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाने आमच्या देशाला मसणवटीची अवकळा आणली आहे. अशा या परिस्थितीत लेखक, कवी, वत्ते, पत्रकारांची मने बधिर झाली आहेत. क्रांतीच्या प्रतिभांचे झरे गोठून गेले आहेत. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या लाचार बनल्या आहेत. लेखकांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य मिशन म्हणून पत्करले पाहिजे. ज्यांनी जनतेला राष्ट्रकार्य आणि राष्ट्ररक्षणासाठी स्फूर्ती द्यावयाला पाहिजे ते स्वतःच सरकारने फेकलेल्या तुकड्यांवर जगण्यासाठी तडफडताना दिसत आहेत. या तडफडणाऱ्या, सरकारी पायाशी वळवळणाऱ्या जिवांना जनतेने असे विचारले पाहिजे की, तुम्ही जनतेच्या बाजूने आहात की जनतेच्या विरुद्ध आहात? राष्ट्र परकीयांकडूनच गुलाम बनते असे नाही, तर स्वकीयांच्या हुकूमशाहीमुळेही आपले राष्ट्र गुलाम बनते व राष्ट्रातील लेखक, विचारवंत, माजी सैनिक लाचार बनतात तेव्हा या गुलामीच्या बेड्या तुटता तुटत नाहीत. या बेड्या तोडण्यासाठी संघर्षाचा एल्गार करणे हीच विजयादशमीची विजय गर्जना आहे. देशाची लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान, जनतेचा आवाज बंदिवान होऊ नये असा संकल्प भारताच्या जनतेने आजच्या दिवशी करणे हाच विजयादशमीचा विजयोत्सव आहे. मुंबईच्या शिवतीर्थावर महाराष्ट्राच्या राजधानीतून हिंदुहृदयसम्राटांनी वर्षानुवर्षे हा विचारांचा वन्ही चेतवून देशाला जाग आणली. ‘महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा कणा ताठ ठेवा’, ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले’ या सेनापती बापटांच्या ज्वलंत मंत्राला पुढे नेले. महाराष्ट्र ज्वलंत आणि जिवंत आहे हे आजची शिवतीर्थावरील विजयादशमी दाखवून देईल.