
देशाची संस्कृती, एकात्मता ज्या मोदी-शहांच्या राजकारणामुळे संकटात आली आहे, देशाचे संविधान, संसद, न्यायव्यवस्थेचा ज्यांच्या कारभारामुळे बोजवारा उडाला आहे, अशा लोकांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा आहे. जनक्षोभ, जन आंदोलन हे जनतेला स्वातंत्र्य व लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत. राज्यकर्त्यांना ते दडपता येणार नाहीत. लोकशाही मार्गानेच बदल शक्य आहे, पण लोकशाही, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट हुकूमशहाच्या कोठ्यावर मुजरे झाडू लागतात तेव्हा काय करायचे? सरसंघचालकांनी देशाला यावर मार्गदर्शन करणे आवश्यक होते. मोदी-शहांच्या कारभाराचे तुणतुणे वाजवायला डरपोक आणि भाडोत्र्यांची मोठी फौज आहे. भागवतही त्यात सामील झाले. ‘भागवत, तुम्हीसुद्धा?’ हा राष्ट्रभक्त जनतेचा सवाल आहे!
सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी मेळाव्यात नेहमीप्रमाणे भाषण केले. त्यात मार्गदर्शक, दिशादर्शक वगैरे असे काही नव्हते. संघ स्थापनेला शंभर वर्षे झाली. त्यामुळे विजयादशमीच्या मेळाव्यातून काही वेगळा संदेश मिळेल असे वाटले होते. सरसंघचालकांनी भाजपचीच ‘री’ ओढली. भागवत यांनी शेजारच्या देशांतील जन आंदोलनाचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला. भारताशेजारील श्रीलंका, बांगलादेश आणि अलीकडे नेपाळ येथे जनक्षोभाचा हिंसक उद्रेक होऊन सत्तांतर घडले. आपल्या देशात तसेच जगभरात अशा प्रकारच्या उपद्रवांना उत्तेजन देणाऱ्या शक्ती सक्रिय आहेत. सरकारविरोधातील असंतोषासाठी रस्त्यावर उतरून हिंसा योग्य नसल्याचे भाष्य सरसंघचालकांनी केले. भागवत यांनी केलेले मार्गदर्शन खरे की हिंदू-मुसलमानांत सतत हिंसा भडकवून द्वेषाचा वणवा पेटवणारे ‘भाजप’चे राजकारण खरे? मोदी-शहांचे राज्य ही संघाची स्वप्नपूर्ती आहे. देशातील एकात्मता संपवून येथे सहिष्णू हिंदूंचे नव्हे, तर धर्मांध, बुरसटलेल्या विचारांच्या हिंदूंचे राज्य यावे व अशा राज्याला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून मान्यता मिळावी, अशी संघाची धारणा आहे. थोडक्यात संघाला येथे हिंदू मोहम्मद अली जीनांचे राज्य हवे आहे. भारताचा ‘हिंदू पाकिस्तान’ करणे हे त्यांचे ध्येय आहे व त्यासाठी देशातील व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, संसद यांचा बळी गेला तरी चालेल. श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशात जनक्षोभ का उसळला याचे चिंतन संघाच्या बौद्धिक विभागाने करायला हवे. तेथील राज्यकर्त्यांनी धर्मांधता व अतिरेकी राष्ट्रवादाचा ‘डोस’ पाजून जनतेला आधी बेधुंद केले. त्या धुंदीची मात्रा वाढवून जनतेला टाळकुटे अंधभक्त केले. जनता त्या समाधी अवस्थेत
पोहोचल्यावर
देशाची लूट करून
मित्रांची, उद्योगपतींची, नातेवाईकांची संपत्ती वाढवली. जनतेची नशा उतरली तेव्हा ती आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरली. सरकारशी रस्त्यावर झगडा केला व सरकारने आंदोलकांना गोळय़ा घातल्या. लोक बंदुकांची पर्वा न करता मंत्र्यांच्या घरात घुसले व विध्वंस केला. भ्रष्टाचाऱ्यांना रस्त्यावर आणून मारले. हा हिंसाचार नक्कीच झाला, पण तो सत्ताधाऱ्यांविरोधातील जनक्षोभामुळे हे लक्षात घेतले पाहिजे. बांगलादेश, नेपाळमध्ये हेच घडले. लोकशाहीचा गळा घोटला जातो व लोकशाही मार्गाने बदल घडवण्याचे मार्ग बंद केले जातात तेव्हाच अशा जनक्षोभातून क्रांती होते. भारतातही असा जनक्षोभ होईल असे भय सरसंघचालकांना वाटते. कारण गेल्या दहा वर्षांत मोदी-शहा यांनी जनतेला खोटी आश्वासने दिली. धार्मिक दंगली घडवल्या. संपूर्ण देश अदानीसारख्या लाडक्या उद्योगपतीच्या खिशात घातला. या दरोडेखोरीवर सरसंघचालकांनी प्रखर भाष्य करणे आवश्यक होते. राष्ट्रीय संपत्तीची ही अशी लूट ब्रिटिश काळात वाढली तेव्हा स्वराज्याचे आंदोलन सुरू झाले. लोक बेभान होऊन रस्त्यावर उतरले. गांधींच्या नेतृत्वाखाली लढा झाला व ब्रिटिशांना या देशातून हाकलून दिले गेले. ब्रिटिशांची साम्राज्यशाही नष्ट केल्यावर भारतात लोकांचे राज्य आले. अर्थात, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व नंतरच्या राष्ट्र उभारणीच्या कार्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोठेच नव्हता. भारताच्या स्वातंत्र्य लढय़ाचा साधा ओरखडाही संघाच्या वाटचालीवर उठला नाही. तरीही हे लोक स्वातंत्र्य, राष्ट्रवाद वगैरेंवर भाषणे झोडतात याचे आश्चर्य वाटते. संघाला शंभर वर्षे झाली म्हणून त्याच्या नावाने पोस्टाचे तिकीट, खास नाणी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली, पण संघाने निर्माण केलेले भाजपचे नाणे खोटे आणि भ्रष्ट आहे. मोदी-शहांसारखे हुकूमशहा संघाने निर्माण केले व त्यांच्या हुकूमशाहीला बळ दिले हे संघाचे पाप आज
देशाच्या बोकांडी
बसले आहे. या मंडळींचा राष्ट्रवादाचा बुरखा रोज फाटत आहे. पहलगाम येथे 26 महिलांचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानबरोबर जय शहा भारतीय संघाला क्रिकेट खेळायला भाग पाडतात व जय शहांचे पिताश्री गृहमंत्री अमित शहा देशवासीयांना राष्ट्रवादाचे व्याख्यान देतात. पुन्हा हे सर्व लोक संघाचे स्वयंसेवक. सोनम वांगचुक यांनी भारतमातेसाठी कष्ट घेतले. भारतीय सैनिकांसाठी संशोधन केले. चीन लडाखमध्ये घुसून भारतीय जमिनीवर ताबा मिळवत आहे, असे वांगचुक यांनी सांगताच त्यांना देशद्रोही ठरवून अटक केली. लडाखमध्ये जनतेचे आंदोलन झाले. ते आंदोलन भाजपच्या फसवणुकीविरुद्ध होते. आंदोलकांनी लडाखमधील भाजपचे कार्यालय जाळले. भाजपचा झेंडा जाळला, पण कार्यालयावरील भारतीय तिरंग्याचे रक्षण केले. असे प्रसंग सरसंघचालकांना रोमांचित करीत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डीएनएत कोणत्या प्रकारचा राष्ट्रवाद व हिंदुत्व आहे यावर संशोधन होणे गरजेचे आहे. देशाची संस्कृती, एकात्मता ज्या मोदी-शहांच्या राजकारणामुळे संकटात आली आहे, देशाचे संविधान, संसद, न्यायव्यवस्थेचा ज्यांच्या कारभारामुळे बोजवारा उडाला आहे, अशा लोकांच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा आहे. जनक्षोभ, जन आंदोलन हे जनतेला स्वातंत्र्य व लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत. राज्यकर्त्यांना ते दडपता येणार नाहीत. लोकशाही मार्गानेच बदल शक्य आहे, पण लोकशाही, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट हुकूमशहाच्या कोठ्यावर मुजरे झाडू लागतात तेव्हा काय करायचे? सरसंघचालकांनी देशाला यावर मार्गदर्शन करणे आवश्यक होते. मोदी-शहांच्या कारभाराचे तुणतुणे वाजवायला डरपोक आणि भाडोत्र्यांची मोठी फौज आहे. भागवतही त्यात सामील झाले. ‘भागवत, तुम्हीसुद्धा?’ हा राष्ट्रभक्त जनतेचा सवाल आहे!