सामना अग्रलेख – आता उष्णतेचा ‘रेड अलर्ट’

कोरोना संकटामुळे सध्या देशाची विभागणी ‘रेड झोन’, ‘ऑरेंज झोन’ आणि ‘ग्रीन झोन’ अशी करण्यात आली आहे. आता उष्णतेच्या लाटेमुळे देशाच्या काही भागात ‘रेड अलर्ट’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ दिले गेले आहेत. शेवटी कोरोनाचा ‘रेड झोन’ काय किंवा उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ काय, ‘घरातच थांबा आणि सुरक्षित रहा’ असाच त्याचा संदेश आहे आणि तो पाळणेच हिताचे आहे. 

कोरोनाचा कहर, त्यात तीव्र उष्णतेची ‘लहर’ अशी सध्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांची अवस्था झाली आहे. पुढील तीन-चार दिवस अशीच स्थिती असेल, सध्याच्या वातावरणात कोणताच बदल होणार नाही असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, हरियाणा आदी राज्यांमध्ये उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. आधीच कोरोनाचे संकट, त्यात उष्णतेच्या लाटेचे तडाखे लोकांना सहन करावे लागत आहेत. मे महिना असल्याने उन्हाळ्याची तीव्रता वाढणार, उष्माघाताची लाट येणार, मुंबईसारख्या महानगरात वाढलेली उष्णता आणि आर्द्रता  यामुळे लोकांची ‘घुसमट’ वाढणार या गोष्टी अपेक्षितच असतात. आताही तेच घडत आहे, फरक फक्त इतकाच की, सध्या सगळे ‘आभाळ’ कोरोनाने व्यापले असल्याने उष्णतेची लाट, उष्माघात, त्याचा ग्रामीण भागात झालेला परिणाम या ‘बातम्यां’ना प्रसारमाध्यमांमध्ये हवे तेवढे स्थान मिळताना दिसत नाही. वास्तविक महाराष्ट्रात उष्माघाताचे आतापर्यंत दोन-तीन बळी गेले आहेत. बुधवारी चंद्रपूर येथे शफिक शेख इमाम या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. शफिक हा गरीब कुटुंबातील होता. एका दुकानात तो काम करीत होता. दुपारी त्याला उष्माघाताचा त्रास झाला आणि दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रपूर हा उष्णतेच्या लाटेचा नेहमीचा हॉट स्पॉट आहे. तसा संपूर्ण विदर्भच दरवर्षी उष्णतेच्या

लाटेच्या फेर्‍या

येत असतो. अकोला जिल्ह्यातदेखील एकाचा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे सांगितले जात आहे. चंद्रपूरचे तापमान सलग तिसर्‍या दिवशी 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. सोमवारी ते 46.6 अंश एवढे होते. एकूणच विदर्भातील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळेच विदर्भात उष्णतेसंदर्भात तीन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि खान्देश येथेही पारा 45-46 अंशाच्या आसपासच आहे. हे दरवर्षीचेच चित्र असले तरी यंदा कमाल तापमान 46 ते 48 आणि किमान तापमान 32 ते 36 अंश सेल्सिअस असे आहे आणि तो धोक्याचा इशारा आहे. कमाल तापमानासोबत किमान तापमानात झालेली वाढ बदललेल्या निसर्गचक्राचे संकेत देणारी आहे. राजस्थानातील चुरू येथे याहीवर्षी तापमानाने 50 अंशाच्या वर उसळी मारली आहे. गेल्या काही वर्षात चुरू हे जगातील सर्वाधिक तापमानाचे ठिकाण ठरत आहे. देशातील इतर नेहमीच्या ‘हॉट स्पॉटस्’च्या तापमानातही वाढच होत आहे. उत्तर प्रदेशमधील बांदा आणि प्रयागराज येथे पार्‍याने 48 अंशाचा टप्पा गाठला आहे. हरियाणामधील हिस्सार येथे तीच स्थिती आहे. राजधानी दिल्लीतील उष्णतेने मागील 17 वर्षांचा उच्चांक मोडला आहे. मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये वेगळे चित्र नाही. सुदैव एवढेच की चार-पाच वर्षांपूर्वी देशभरात उष्णतेच्या लाटेने जसे थैमान घातले होते तसे यावेळी घातलेले नाही. त्यावेळी उष्णतेच्या तडाख्याने 500 पेक्षा जास्त बळी गेले होते. यावेळी तसे घडलेले नाही आणि

सध्या उसळलेली

उष्णतेची लाट चार-पाच दिवसांनी काही प्रमाणात ओसरेल असा अंदाज हवामान खात्यानेच वर्तवला आहे. तरीही पुढील काही दिवस ‘दुपारी घराबाहेर पडू नका’ असा सावधानतेचा इशारा हवामान खात्याने दिलाच आहे. म्हणजे मागील दोन महिन्यांपासून कोरोना टाळण्यासाठी ‘घरातच थांबा’ असे आवाहन केले जात आहे. आता उष्णतेची लाट असलेल्या भागात उष्माघात टाळण्यासाठी ‘घराबाहेर पडू नका’ असे हवामान खाते सांगत आहे. त्यात चुकीचे काहीच नाही. शेवटी प्रश्न जीव वाचण्याचा आहे. कोरोना लॉक डाऊनमुळे देशातील जनता घरी बसलीच आहे, त्यात उन्हाच्या लाटेमुळे दुपार घरात काढावी लागली तर बिघडले कुठे? उष्णतेचा रेड अलर्ट देणार्‍या हवामान खात्यानेच महिनाखेर वाढलेला पारा खाली येईल असे सांगितले आहे. शिवाय 5 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये तर 15 ते 20 जूनदरम्यान मुंबईमध्ये आगमन करेल असे भाकीत वर्तवले आहे. मान्सूनच्या आगमनाची ही ‘नांदी’ नक्कीच सुखद आहे, पण तूर्त तरी उष्णतेच्या लाटेचा विचार महत्त्वाचा आहे. कोरोना संकटामुळे सध्या देशाची विभागणी ‘रेड झोन’, ‘ऑरेंज झोन’ आणि ‘ग्रीन झोन’ अशी करण्यात आली आहे. आता उष्णतेच्या लाटेमुळे देशाच्या काही भागात ‘रेड अलर्ट’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ दिले गेले आहेत. शेवटी कोरोनाचा ‘रेड झोन’ काय किंवावा उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ काय, ‘घरातच थांबा आणि सुरक्षित रहा’ असाच त्याचा संदेश आहे आणि तो पाळणेच हिताचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या