सामना अग्रलेख – महाराष्ट्र अखंड, मराठी एकत्र! लढू आणि जिंकू!!

सत्तेच्या जोरावर मराठी माणसाचे जास्तीत जास्त खच्चीकरण करण्याचे धोरण दिल्लीने स्वीकारले. भाजप व मिंध्यांचे लोक महाराष्ट्रावरील हे आक्रमण निमूटपणे सहन करीत आहेत. कारण त्यांची अवस्था दिल्लीच्या बुटचाट्यांसारखी झाली. या महाराष्ट्रद्रोह्यांना धूळ चारण्यासाठी व मराठी जनांचा आवाज बुलंद करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले हा महाराष्ट्रासाठी शुभशकून आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्ही घाबरत नाही, असे भाजप व मिंध्यांचे लोक सांगतात. हीच त्यांच्या पोटातली भीती थोबाडातून बाहेर पडत आहे. महाराष्ट्र आता उसळून प्रतिकार करेल. मराठी माणूस अन्यायाविरुद्ध उभा राहील. तो लढेल आणि जिंकेल. ठाकरे बंधू एकत्र येण्याचा हाच संदेश आहे!

महाराष्ट्राच्या परमपवित्र भगव्या ध्वजाला अभिवादन करून उद्धव आणि राज ठाकरे यांनी मराठी ऐक्याचा मंगल कलश महाराष्ट्राच्या मस्तकी लावला आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आतापर्यंत असंख्य युत्या आणि आघाड्या झाल्या असतील, पण महाराष्ट्रात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत झालेली युती ऐतिहासिक, क्रांतिकारक आणि मराठी माणसाला बळ देणारी ठरणार आहे. वरळीच्या ‘ब्लू सी’ हॉटेलात दोन पक्षांत ‘युती’ झाली व ‘मुंबईसह महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांत आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत,’ असे दोन्ही ठाकरे बंधूंनी सांगितले तेव्हा मराठी मनात आणि मनगटात चैतन्य उसळले. मुंबई महानगरपालिकेत दोन पक्षांत जागांचे वाटप कसे झाले? जागांचा फॉर्म्युला काय? या प्रश्नांवर राज ठाकरे यांनी षटकार ठोकला, ‘‘आकडे वगैरे सांगण्याची गरज नाही. मी सांगणार नाही.’’ याचा संदेश स्पष्ट आहे. मराठी माणसाच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी झालेली ही युती म्हणजे व्यापार नाही, जागांची चढाओढ नाही, बाजार नाही. मुंबईच्या रक्षणासाठी त्याग आणि बलिदानाची तयारी ठेवून ठाकरे बंधू एकत्र आले. महाराष्ट्र हा नावाप्रमाणे महान देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आतापर्यंतच्या असंख्य महापुरुषांची केवढी प्रचंड परंपरा या महाराष्ट्रास लाभली आहे! महापुरुषांची वानवा या महाराष्ट्रामध्ये कधीही नव्हती, पण मुंबईत मराठी माणसाची आणि देशाच्या राजकारणात महाराष्ट्राची प्रचंड पीछेहाट होताना दिसत आहे. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा जयजयकार होण्याचे थांबले आहे. मुंबईसह महाराष्ट्र व्हावा यासाठी

संयुक्त महाराष्ट्राचा लढा

उभा राहिला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान मुंबईतील उपऱ्या धनिकांनी व शेठजींनी रचले. ते हाणून पाडण्यासाठी मराठी माणसाला 106 हुतात्मे वेदीवर चढवावे लागले याचे भान नसलेली पिढी आज महाराष्ट्रात तरारली आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षात आजचा भाजप कधीच नव्हता. किंबहुना अखंड महाराष्ट्र ही कल्पनाच त्यांना मान्य नाही. भाजपमधील थैलीबाज पुढाऱ्यांना मुंबई महाराष्ट्रात राहिली काय किंवा तिचा शहा-मोदींनी तुकडा पाडला काय, त्याविषयी कोणत्याच तीव्र भावना नाहीत. ‘मुंबईच्या लुटीतला आमचा वाटा आमच्या पदरात टाका व मुंबईचा लिलाव करा’ असा विचार करणारे भाजप व त्यांचे बगलबच्चे आहेत. मुंबईतील मराठी माणसाचे उरलेसुरले जीवन उजाड करण्यासाठी त्यांनी लोढा, पारेख, पटेल, अदानी असे बिल्डर्स महाराष्ट्राच्या छाताडावर बसवले आहेत. मुंबईच्या आसपासचा सर्व सुवर्ण परिसर गुजरातच्या व्यापाऱ्यांनी विकत घेतला आहे. पनवेल, ठाणे, पालघर, डहाणू, रायगड, अलिबागपर्यंतच्या मोक्याच्या जमिनी ‘शहां’च्या पिलावळीने ताब्यात घेतल्या आहेत व भाजपवाले या पिलावळींचे पोशिंदे बनले आहेत. अशा लांडग्यांच्या हाती मुंबई व मराठी माणसाचे भविष्य सुरक्षित नाही. मुंबई गुजरातला जोडण्याचे ‘शहा’ कंपनीचे स्वप्न जुने आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा अडसर होता. म्हणून ‘शहा’ कंपनीने मराठी माणसांची अभेद्य संघटना शिवसेना तोडून बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प आणि स्वप्न पायदळी तुडवले. शिंदे-मिंधेंसारखे ‘खोजे’ उभे करून त्यांनी मुंबईवरील

मराठी माणसाची मूठ

कमजोर केली. मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार राहू नये व मराठी संस्कृतीच्या सर्व खुणा पुसल्या जाव्यात यासाठी शहा मंडळींची शर्थ चालली आहे. शहा-मोदींच्या मनात महाराष्ट्राविषयी द्वेष आहे, तितकेच भयही आहे. त्याचे कारण असे की, मराठी लोक शूर आहेत, मराठी लोक मुत्सद्दी आहेत, मराठी लोक राजकारणी आहेत. मराठी लोकांनी दिल्लीसह अटकेपार झेंडा फडकवला आहे. मराठी माणूस राष्ट्रभक्त आहे. मराठी माणसाने जगातले पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री सदैव धावून जातो. महाराष्ट्र अन्यायाविरुद्ध मुठी आवळून त्वेषाने उठतो व लढायला सिद्ध होतो. अशा मराठी माणसांचे भय दिल्लीतील ‘शहा’ मंडळींना वाटते. त्यामुळे सत्तेच्या जोरावर मराठी माणसाचे जास्तीत जास्त खच्चीकरण करण्याचे धोरण दिल्लीने स्वीकारले. भाजप व मिंध्यांचे लोक महाराष्ट्रावरील हे आक्रमण निमूटपणे सहन करीत आहेत. कारण त्यांची अवस्था दिल्लीच्या बुटचाटय़ांसारखी झाली. मिंधे व त्यांचे लोक तर शहांचे हरकामेच बनले आहेत. पैसे लुटण्याचे व त्या लुटीवर निवडणुका लढवण्याचे परमिट शहांनी दिल्यामुळे मराठी माणसावरील हल्ले व महाराष्ट्राची पीछेहाट ते उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. या महाराष्ट्रद्रोह्यांना धूळ चारण्यासाठी व मराठी जनांचा आवाज बुलंद करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले हा महाराष्ट्रासाठी शुभशकून आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्ही घाबरत नाही, असे भाजप व मिंध्यांचे लोक सांगतात. हीच त्यांच्या पोटातली भीती थोबाडातून बाहेर पडत आहे. महाराष्ट्र आता उसळून प्रतिकार करेल. मराठी माणूस अन्यायाविरुद्ध उभा राहील. तो लढेल आणि जिंकेल. ठाकरे बंधू एकत्र येण्याचा हाच संदेश आहे!