
हिंदी सक्तीचा आदेश सरकारने रद्द केला. राज आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीविरोधात एकत्र आले. त्यातून मराठी माणूस विश्वासाने या सक्तीविरोधात रस्त्यावर उतरला. मोर्चा झाला नाही, पण विजयी जल्लोष एकत्र झाला. मराठी माणूस मुंबईसह महाराष्ट्रात चांगल्या स्थितीत नाही. त्यामुळे आधी ठाकऱ्यांची व नंतर मराठी माणसांची एकजूट महत्त्वाची आहे.
केंद्र सरकारच्या हिंदी सक्ती कायद्याने महाराष्ट्रासाठी एकच महत्त्वाचे घडले ते म्हणजे मराठी अस्मितेसाठी अवघा मराठी माणूस एक झाला व या मराठी जनांच्या रेट्यामुळे उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र एका मंचावर आले. फडणवीस सरकारला महाराष्ट्रातील हिंदी सक्तीचा आदेश रद्द करावा लागला. त्यामुळे 5 जुलैच्या मोर्चाचे रूपांतर मराठी विजय दिवसात झाले. दोन्ही ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत एक नेत्रदीपक विजय सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भवितव्यासाठी हे चित्र आशादायी आहे. हिंदी भाषेच्या सक्तीविरुद्ध महाराष्ट्रासह अनेक राज्यांत ‘भाषायुद्ध’ भडकले. दक्षिणेची राज्ये तर हिंदीविरोधात ‘मरू किंवा मारू’ या त्वेषाने उभी राहिली. महाराष्ट्राने विरोध सुरू केला, पण याप्रश्नी ‘ठाकरे’ एकत्र येऊन मराठी माणसाचे नेतृत्व करीत आहेत या बातमीनेच सरकारने माघार घेतली हे महत्त्वाचे.
राक्षसी महत्त्वाकांक्षा
मराठी माणूस एकवटला व त्याचे नेतृत्व ‘ठाकरे’ यांनी केले तर काय घडू शकते, हे यानिमित्ताने दिसले. भारतीय जनता पक्षाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला रोखण्यासाठी उद्धव व राज यांनी एकत्र यावे. ते एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान होईल आणि ते कधीच भरून निघणार नाही ही भावना वाढत गेली. नारायण राणे, एकनाथ शिंदे व भाजपमधील ‘बाटगे’ ठाकऱ्यांच्या एकत्र येण्यावर शिमगा करीत राहिले, पण एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लोकांनी भाजपचे बूटचाटे धोरण स्वीकारून मराठी माणसाची एकजूट फोडली. भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे मुंबईतील आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी भाजपने ‘शिवसेना’ फोडली. मराठी माणसाला आपापसात लढवण्याचे उद्योग सुरू केले. यात पैशांचा खेळ मोठय़ा प्रमाणावर सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत मराठी माणसाची कशी गळचेपी सुरू आहे ते पहा –
– अमित शहा, नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत. संयुक्त महाराष्ट्र लढय़ामुळे मुंबई गुजरातला मिळाली नाही याबद्दल त्यांच्या मनात खदखद आहे. आमच्या सत्ताकाळात ‘मुंबई’ला गुजरातची गुलाम करू हे त्यांचे धोरण आहे.
– छत्रपती शिवरायांनी ‘इंग्रजां’ना खंडणी देणाऱ्या सुरतच्या व्यापारी वर्गावर हल्ला करून या इंग्रजधार्जिण्या व्यापारी वर्गाची लूट केली. याचा बदला म्हणून मुंबईची लूट करायची आणि शिवरायांच्या महाराष्ट्राचा बदला घ्यायचा हे मोदी-शहांचे अंतस्थ धोरण आहे.
– महाराष्ट्राचा अभिमान ठरलेली सर्व शासकीय कार्यालये मुंबईतून हलवली गेली आहेत. त्यातील डायमंड बाजार, एअर इंडिया वगैरे मुंबईतून गुजरातमध्ये सरकवली.
– मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन ही अहमदाबादच्या श्रीमंत व्यापाऱ्यांच्या सोयीची आहे. मुंबई-दिल्ली, मुंबई-इंदूर अशी बुलेट ट्रेन करता आली असती, पण मुंबई थेट गुजरातशी जोडण्यात आली व त्यासाठी पालघर, डहाणू, ठाणे जिह्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या. मुंबईच्या ‘बीकेसी’मधील महत्त्वाचा भूखंडही बुलेट ट्रेनच्या नावाखाली लुबाडण्यात आला.
– मुंबईतील मराठी शाळा, मराठी ग्रंथालये आर्थिक तरतुदीअभावी बंद पडत आहेत.
– मराठी माणसांच्या संस्था, संघटना यांचे पद्धतशीर खच्चीकरण सुरू झाले आहे.
– घाटकोपरसारख्या विभागाची भाषा ‘मराठी’ नसून गुजराती असल्याचा साक्षात्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झाला व त्यांनी तसे बोलून दाखवले.
– मराठीचा आग्रह धरणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
– गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात एकही मोठा उद्योग आला नाही. उत्तर महाराष्ट्रात गुंतवणूक करू पाहणारे बाहेर गेले. मुंबईत आता कोणताही महत्त्वाचा उद्योग राहिला नाही. आडवी मुंबई उभी करणे म्हणजे बांधकाम व्यवसाय हाच एक उद्योग असून मुंबईतील जमिनींचे सर्व मोक्याचे पट्टे अमराठी लोकांच्या हाती गेले. लोढा, अदानी यांच्या नावाने टावर्स उभे राहत आहेत. वांद्र्यातील मोक्याच्या जागी, म्हाडाच्या इमारतीवर मुंबईतील बडे बिल्डर, उद्योगपतींचा डोळा आहे. म्हाडा कार्यालय हलवून तेथे व्यापारी संकुल उभारण्याच्या हालचाली धक्कादायक आहेत. अशा तऱ्हेने एक दिवस हुतात्मा चौकाचा भूखंडही बाहेरचे बिल्डर, उद्योगपती घेतील.
– धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली गौतम अदानी यांना मोदी, शहा व फडणवीस यांनी मुंबई लुटण्याचा मुक्त परवाना दिला. बांद्रा रेक्लमेशन, कुर्ल्याची मदर्स डेअरी, दहिसर टोलनाका, मुलुंड टोलनाका, मिठागरांच्या मोक्याच्या जमिनी अदानी यांना देण्यात आल्या. धारावी विकासाचे काम म्हाडा मराठी बिल्डरांच्या मदतीने सहज करू शकली असती, पण मुंबईचा सातबारा अदानींच्या नावावर करण्याचा हा प्रयत्न फडणवीस पुढे नेत आहेत.
– मुंबई व उपनगरातील वीज वितरण व त्याबाबतच्या बिलांची रक्कम जमा करण्याचे कंत्राट गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आले आहे.
– नाशिक-त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारने 20 हजार कोटी रुपये मंजूर केले. कुंभमेळय़ातील सर्व प्रमुख ‘ठेके’ गुजरातच्याच ठेकेदारांना मिळत आहेत. हे सगळे महाराष्ट्रावर, मराठी माणसावर अन्याय करणारे आहे. मोदी, शहा, फडणवीस यांच्या काळात मराठी माणूस जणू सत्ताधाऱ्यांचा गुलाम झाला. तो स्वतःचे तेज आणि शौर्य विसरला. मालवणात शिवरायांचा पुतळा पहिल्यांदा पडला. दुसऱ्या वेळेस पुतळ्याखालच्या जमिनीस तडे गेले. तरीही मराठी माणूस गप्प राहिला. तो हिंदीच्या सक्तीने उसळला व ‘ठाकरे’ एकत्र येत आहेत या भरवशावर लढायला सज्ज झाला!
मार्ग भिन्न, तरीही…
राजकारणात उद्धव व राज ठाकरे यांचे मार्ग भिन्न आणि दोन टोकाचे झाले. शहा यांनी पाडलेल्या फुटीनंतर शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीत सहभागी झाली. राज ठाकरे हे भाजप, शिंदे गट वगैरेंशी प्रेमाचे चहापान करीत राहिले. अमित शहांना भेटण्यासाठी ते एकदा दिल्लीतही जाऊन आले, पण त्यामुळे महाराष्ट्राचा फायदा झाला नाही आणि मनसेचा राजकीय पटही पुढे सरकला नाही. मराठी माणसांत आणि ठाकरे बंधूंमध्ये फूट पाडणे यातच दिल्ली आणि येथील व्यापारी राजकारणाचे हित आहे. मतदार याद्यांत लाखो परप्रांतीय नावे घुसवून भाजप व त्यांचे मित्रपक्ष निवडणुका जिंकत आहेत. यात मनसेचाही पराभव झाला. मतांचा मराठी टक्का वाढवणे. त्यातून सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, विधानसभा निवडणुकांत एकीचे आव्हान उभे करणे यातच महाराष्ट्र हित आहे. विजयी जल्लोषाची मांडव परतणी मार्गी लागली तरच मराठी माणसाला स्वाभिमानाने जगता येईल. नाहीतर ढोल-नगारे वाजतील, गर्जना झडतील, रणशिंगे फुंकली जातील. हा जोश तसाच राहायला हवा!
‘मराठी एकजुटीचा विजय असो!’ तूर्त इतकीच गर्जना करू या!
Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]