
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाचे ४१ हजार रुपयांचे वीज बिल थकवल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’ने प्रसिद्ध करताच पुरातत्व विभागाने हे बिल अखेर आज महावितरणकडे भरले आहे. तब्बल ९ महिन्यांपासून या विभागाने बिलच भरलेले नव्हते. मात्र दैनिक ‘सामना’ने दणका देताच दंडासहित ५६ हजार ५१० रुपये भरण्यात आले आहेत. दरम्यान यापुढे असा प्रकार घडला तर सहन केला जाणार नाही, असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.
किल्ले रायगडाचे ४१ हजार रुपयांचे विजेचे बील सरकारने थकवल्याचे वृत्त २९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले. त्यानंतर शिवप्रेमींनीदेखील संताप व्यक्त केला. विविध योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना रायगडावरील विजेचे बिल भरण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत काय, असाही सवाल विचारण्यात आला होता. किल्ले रायगडावरील पुरातत्व विभागाचे बुकिंग ऑफिस, जगदिश्वर मंदिर, राजदरबार येथील विजेचे बिल प्रशासनाने भरले नव्हते.
दंडासहित रकमेचा तपशील
जगदिश्वर मंदिर – १२ हजार ४८०, रायगड बुकिंग ऑफिस – ९ हजार ४७०, राजदरबार २४ हजार, अन्य दोन मीटर – ७ हजार ३२० व ३ हजार २४०.
अखेर सरकारला जाग आली
बुकिंग ऑफिसचे ६ हजार ५८८ रुपये, जगदिश्वर मंदिराचे ११ हजार ७०८ रुपये व राजदरबाराचे २३ हजार ३२३ रुपये एवढी थकबाकी होती. ही रक्कम एकूण ४१ हजार ६१९ एवढी झाली. प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर राज्य व केंद्र सरकार खडबडून जागे झाले. आज अखेर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दंडासहित ५६ हजार ५१० रुपयांची रक्कम महावितरणच्या कार्यालयात भरली.
 
             
		




































 
     
    





















