सामना प्रभाव! रेल्वे फाटकावर उड्डाणपूल, खर्डीकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट

फाटकावर होणाऱ्या उड्डाणपुलामुळे दळखण, धामणी, जरंडी, काष्टी, चांदा या गावातील नागरिकांना मुख्य बाजारपेठेत पोहोचणे काही मिनिटातच शक्य होणार आहे. मात्र रेल्वे क्रॉसिंगसाठी तासन्तास वाहतूककोंडीत अडकलेले वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या पुलासाठी खासदार सुरेश उर्फ बाळ्या-मामा म्हात्रे यांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच दैनिक ‘सामना’नेही वृत्त प्रसिद्ध केले होते. यामुळे खर्डीवासीयांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

खर्डी स्थानकाच्या पूर्वेला दळखण, धामणी, जरंडी, काष्टी व चांदा ही गावे आहेत. या गावातील नागरिकांना बाजारहाट, दवाखान्यात व कामधंद्यानिमित पूर्वेला असलेल्या मुख्य बाजारपेठेत जावे लागते. मात्र यामध्ये रेल्वे फाटक असल्याने लोकल ट्रेन, एक्स्प्रेस व मालगाडी यांची ये-जा सुरू असते. त्यामुळे वाहनचालकांना तासन्तास वाहतूककोंडीत अडकून पडावे लागते. या वाहतूककोंडीमुळे विद्यार्थ्यांना अनेकदा लेटमार्क लागतो. याची गंभीर दखल घेऊन सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे उड्डाणपुलाचा विषय लावून धरला. दैनिक ‘सामना’नेही वृत्त प्रसिद्ध करून समस्येला वाचा फोडली. यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले असून उड्डाणपुलाला मंजूर दिली. यामुळे खर्डीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खर्डी स्थानकाजवळील दळखण, धामणी व उबरखांड ग्रामपंचायतसहित अन्य गावांना जोडणाऱ्या रेल्वे फाटकावर उड्डाणपूल होणार असल्याने येथील वाहनचालकांची समस्या कायमची दूर होणार आहे. उड्डाणपूल व्हावा यासाठी रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे.

सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, खासदार, भिवंडी लोकसभा