सामनाच्या दणक्याने ठाणे महापालिका ताळ्यावर; ‘गडकरी’त हिंदीतल्या ‘निकास’ला बाहेर चा रस्ता

भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांच्या नावाने उभारलेल्या आणि नूतनीकरण झालेल्या गडकरी रंगायतन नाट्यगृहातून बाहेर पडताना दरवाजाजवळ चक्क हिंदीत ‘निकास’ असा ठसठशीत शब्द दिसत होता. ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ‘बाहेर ‘ऐवजी हिंदीतल्या ‘निकास’ शब्दाचा ‘प्रयोग’ केल्याने ठाणेकर रसिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘दैनिक सामना’ ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करत जनतेचा आवाज बुलंद केला. त्यामुळे सामनाच्या दणक्याने ठाणे महापालिका ताळ्यावर आली असून हिंदी निकास हा शब्द हटवत तेथे बाहेर हा मराठी शब्द कोरण्यात आला आहे.

ऐतिहासिक ठाणे शहराची ओळख असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनसाठी ३१ कोटीहून अधिक निधीतून जुन्या वास्तूचे मजबुतीकरण आणि सौंदर्योकरण करण्यात आले आहे. हे नाट्यगृह पालिका प्रशासनाने स्वातंत्र्यदिनी हे नाट्यगृह पुन्हा खुले केले आहे. मात्र, रंगायतनमधून नाट्यरसिक बाहेर पडतात त्या दरवाजावर ‘बाहेर’ या मराठी शब्दाऐवजी चक्क हिंदीत ‘निकास’ असा शब्द लिहिला होता. रंगायतनमधून बाहेर पडणाऱ्या दोन दरवाजावर ठसठशीतपणे ‘निकास’ असा उल्लेख करण्यात आला होता. याबाबत जनतेतून संताप व्यक्त होत होता. दैनिक सामनाने या विषयाला प्रसिद्धी देत जनतेचा आवाज बुलंद केला होता. याआधी गडकरी रंगायतनमध्ये ‘आत’ आणि ‘बाहेर’ असे शब्द लिहिले होते. त्याप्रमाणे बदल करण्यात यावे. निकास हा हिंदी शब्द का वापरला, अशी प्रतिक्रिया रसिक विचारत होते. आता सामनाच्या दणक्यानंतर ठाणे माहापालिका खडबडून जागी झाली असून हिंदी निकास शब्दाऐवजी मराठी बाहेर हा शब्द वापरण्यात आला आहे.