चिनी रोबोट प्रकरणी केलेला दावा आला अंगाशी? ‘गलगोटियास’च्या प्रोफेसरचा ‘Open To Work’ फोटो व्हायरल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
galgotias prof neha singh linkedin pic viral after robot controversy

नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये चिनी बनावटीच्या ‘रोबोटिक डॉग’ला स्वतःच्या विद्यापीठाने बनवल्याचा कथित दावा करणे गलगोटियास विद्यापीठाच्या प्रतिनिधीला चांगलेच महागात पडले आहे. या वादामुळे संबंधित प्राध्यापिका नेहा सिंह यांचा ‘Open To Work’ असा उल्लेख असलेला लिंकडइन प्रोफाईल फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इंग्रजी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गलगोटियास विद्यापीठाच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’च्या प्रमुख नेहा सिंह यांनी एका मुलाखतीदरम्यान ‘ओरियन’ (Orion) नावाचा रोबोट दाखवला होता. हा रोबोट त्यांच्याच विद्यापीठाने विकसित केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, नेटिझन्सनी काही वेळातच हा दावा खोडून काढला. हा रोबोट प्रत्यक्षात चीनच्या ‘युनिट्री रोबोटिक्स’ (Unitree Robotics) कंपनीचा ‘Unitree Go2’ असल्याचे उघड झाले. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आयोजकांची कडक कारवाई

हा प्रकार उघडकीस आल्यावर बुधवारी भारत मंडपममधील या कार्यक्रमाच्या आयोजकांनी विद्यापीठाच्या स्टॉलचा वीजपुरवठा खंडित केला आणि त्यांना कार्यक्रम स्थळ सोडण्यास सांगितले. यानंतर विद्यापीठाने अधिकृत माफीनामा जाहीर केला असून नेहा सिंह यांना तंत्रज्ञानाबद्दल पुरेशी माहिती नसल्याचे म्हटले आहे. कॅमेऱ्यासमोर बोलण्याच्या उत्साहात त्यांनी चुकीची माहिती दिली आणि त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा अधिकार नव्हता, असे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले आहे.

नेहा सिंह यांची पार्श्वभूमी

नेहा सिंह या गलगोटियास विद्यापीठात ‘कम्युनिकेशन विभाग’ प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. नोव्हेंबर २०२३ पासून त्या या पदावर आहेत. त्यापूर्वी त्यांनी शारदा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम केले आहे. त्यांनी इंदूरच्या देवी अहिल्या विश्वविद्यालयातून एमबीए पूर्ण केले आहे. त्यांचा ‘Open To Work’ फोटो व्हायरल झाल्याने त्या आता नोकरीच्या शोधात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेहा सिंह यांचे स्पष्टीकरण

वादानंतर स्पष्टीकरण देताना नेहा सिंह म्हणाल्या की, ‘आम्ही हा रोबोट स्वतः बनवल्याचा दावा कधीच केला नाही. मी वापरलेला शब्द आणि त्याचा लावण्यात आलेला अर्थ यामुळे गोंधळ झाला असावा. विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आम्ही हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले होते. गर्दी आणि गोंधळामुळे माझा मुद्दा मांडण्यात चूक झाली असेल’.

सरकारचा इशारा

माहिती तंत्रज्ञान सचिव कृष्णन यांनी यावर कडक भूमिका घेतली आहे. ‘जर एखादी संस्था दुसऱ्याचे तंत्रज्ञान स्वतःचे सांगून लोकांची दिशाभूल करत असेल, तर अशा वादग्रस्त संस्थांचे प्रदर्शन सरकार खपवून घेणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.

galgotias prof neha singh linkedin pic viral after robot controversy

read on saamana about galgotias university robot row. prof neha singh claimed chinese unitree go2 dog as university innovation at ai summit