
केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिराचे दरवाजे मंडला पूजेसाठी शनिवारी संध्याकाळी उघडण्यात आले. गेल्या वर्षी महिलांच्या मंदिरप्रवेशाचा वाद चिघळल्याने परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. मात्र, यावेळी या परिसरात शांतता आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी आलेल्या 10 महिलांना केरळ पोलिसांनी रोखले असून प्रवेशाच्या प्रथेबाबत समजावून सांगत त्यांना परत पाठवण्यात आले आहे.
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या 28 सप्टेंबर 2018 च्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण आता 7 न्यायमुर्तीच्या पीठाकडे पाठवण्यात आले आहे. शबरीमला मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेशास मनाई आहे. याला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रेवेश देण्याचे आदेश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचे आदेश दिले असतानाही शनिवारी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर 10 महिलांना प्रवेशासाठी रोखण्यात आले. केरळ पोलिसांना पंबा बेस कॅम्पजवळ या महिलांचे ओळखपत्र तपासल्यावर त्या 10 ते 50 वयोगटातील असल्याचे आढळल्याने त्यांना प्रवेशास मनाई करण्यात आली. या 10 महिलांपैकी तीन महिला आंध्र प्रदेशच्या विजयवाडाहून आल्या होत्या आणि भाविकांच्या एका जत्थात सहभागी होत्या. या महिलांना मंदिराच्या महिलांच्या प्रवेशाच्या प्रथेबाबत माहिती दिल्यानंतर त्या परतल्या असल्याची माहिती देण्यात आली. शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबतच्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यांच्या पीठाचा निर्णय येईपर्यंत महिलांना मंदिरापर्यंत पोहचवण्याबाबत सरकार कोणताही निर्णय घेणार नसल्याचे केरळ सरकारने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी केरळ सरकारने मंदिर प्रवेशासाठी महिलांना संरक्षण दिल्याने सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात आला होता.