धक्कादायक – शबरीमाला मंदिरातील करोडो रुपयांचे सोने गायब

केरळमधील जगप्रसिद्ध शबरीमाला मंदिरातील करोडो रुपयांचे सोने गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केरळ हायकोर्टाने याची गंभीर दखल घेतली आहे.

शबरीमाला मंदिराच्या गर्भगृहात सोन्याचा मुलामा देण्याचे काम 2019 मध्ये हाती घेण्यात आले होते. त्यासाठी 42 किलो सोने मंदिरातून नेण्यात आले होते. दरम्यान, सोन्याचा मुलामा दिल्यानंतर त्या प्लेट्स आणल्या गेल्या. मात्र, वजन केले असता त्यातील 4.45 किलो सोने गायब झाल्याचे आढळले. या सोन्याचा शोध घेण्यासाठी हायकोर्टाचे दार ठोठावण्यात आले असून याप्रकरणी सखोल तपास करण्याचे आदेश कोर्टाने दिले. तपासाला त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने पूर्ण सहकार्य करावे, असे निर्देशही कोर्टाने दिले.

गायब झालेली वस्तू पेट्रोल असते तर एकवेळ आम्ही समजून घेतले असते. मात्र, 4.45 किलो सोने गायब झाले आहे. सोन्याचे वजन कसे कमी होऊ शकते, असा प्रश्न विचारतानाच शबरीमाला मंदिराबाबतची आस्था आणि श्रद्धा यांच्याशी तडजोड होऊ शकत नाही, असे कोर्टाने नमूद केले.