सहा महिन्यांनी पुन्हा घुमली ‘श्री स्वामी शरणम’ची घोषणा, सबरीमालाचे स्वामी अय्यप्पा मंदिर भाविकांसाठी खुले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळच्या शबरीमला येथील प्रसिद्ध स्वामी अय्यप्पा मंदिर शनिवारी भाविकांना पूजा आणि दर्शनासाठी खुले करण्यात आले. कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या अय्यप्पाच्या पहाडावर ‘श्री स्वामी शरणम’चा घोष आज पुन्हा सुमारे सहा महिन्यांनंतर घुमला. मास्क आणि कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र दाखवत भाविकांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिर मासिक पूजेसाठी खुले करण्यात आले आहे. मल्याळम महिना तुलमच्या निमित्ताने भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. पाच दिवसांच्या पूजेसाठी हे मंदिर खुले करण्यात आले असून कोरोना प्रतिबंधक सुरक्षा नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी केली जात आहे. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शबरीमला मंदिरदेखील बंद होते.

शनिवारी स्वामी अय्यप्पांचे दर्शन घेण्यासाठी 246 लोकांनी ऑनलाइन बुकिंग केले होते. 21 ऑक्टोबरपर्यंत दिवसाला फक्त 250 लोकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मंदिराकडून सर्व काळजी घेतली जात आहे. कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र न आणणाऱयांसाठी रॅपिड टेस्टची सुविधा मंदिर बोर्डाने उपलब्ध करून दिली आहे.

मंदिर परिसरात रात्री मुक्कामास मनाई
स्वामी अय्यप्पांना अभिषेक करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पूजा आणि अभिषेकासाठी भाविकांना फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे. पण हे प्रमाणपत्र 48 तासांच्या आत काढलेले असावे असे ठरले आहे. मंदिरात 10 ते 60 वयोगटातील भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. याशिवाय पारंपारिक पवित्र स्नानाला बंदी असून बेस कॅम्प किंवा मंदिराच्या मुख्य परिसरात रात्री मुक्कामास मनाई करण्यात आली आहे.