
क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर अशी उपाधी मिळालेला हिंदुस्थानचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याच्या कर्तृत्वावर कोणालाही शंका नाही. मात्र टीम इंडियाला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेटमध्ये शतक ठोकण्यात माहीर होता, मात्र तो या शतकाचे रूपांतर द्विशतकात आणि त्रिशतकात करण्यात ‘मास्टर’ नव्हता असे कपिल देव यांनी म्हंटले आहे. महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू व्ही रमण यांच्याशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
वीरेंद्र सेहवाग, जावेद मियादाद, रिकी पाँटिंग, युनूस खान आणि मार्वन अट्टापट्टू यांच्याप्रमाणे सचिनच्या नावावर 6 द्विशतक आहेत. मात्र खेळलेल्या लढती आणि द्विशतक यांची तुलना केल्यास तो 12 व्या स्थानावर आहे. कारण हे 6 द्विशतक ठोकण्यास त्याला 200 कसोटी सामने खेळावे लागले. या यादीत पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू सर डॉन ब्रॅडमन असून त्यांनी कमी लढतीत 12 द्विशतक ठोकले आहेत.
याबाबत बोलताना कपिल देव म्हणाले की, वेगवान गोलंदाज असो किंवा फिरकीपटू या दोन्ही गोलंदाजांच्या प्रत्येक षटकात चौकार ठोकण्याचा क्षमता सचिनमध्ये होती. त्यामुळे त्याच्या नावावर कमीतकमी 5 त्रिशतक आणि 10 द्विशतक असायला हवे होते. मात्र त्याला एकही त्रिशतक ठोकता आले नाही. याला सचिनची सुरुवातीची कारकीर्द जबाबदार असल्याकगे कपिल देव म्हणाले. सचिन मुंबईचा असल्याने शकत ठोकल्यावर नव्याने सुरुवात करण्याची मानसिकता त्यात होती. मात्र मला हे अधिक आवडले नाही, कारण तुम्ही जर चांगले फलंदाज असाल तर गोलंदाजांना घाबरून चालणार नाही. शतक ठोकल्यावर सचिन अनेकदा आतिषबाजी करण्याऐवजी एकेरी-दुहेरी धावांवर भर द्यायचा, असेही ते म्हणाले.

1999 ला पहिले द्विशतक
सचिनने 1999 ला पहिले द्विशतक ठोकले होते. पहिले द्विशतक ठोकण्यासाठी त्याला 10 वर्ष वाट पहावी लागली. त्याच्या नावावर 51 कसोटी शतक असून यातील 20 शतकांवेळी त्याने 150 हून अधिक धावा केल्या आहेत.


























































