‘सचखंड’ एक्सप्रेसच्या प्रवाशांची आजपासून कोरोना चाचणी, रेल्वे स्टेशनवर मनपाची दोन पथके तैनात

दिल्लीत कोरोना आजाराच्या दुसऱ्या लाटेचा कहर माजला आहे. त्या पाश्र्वभूमीवर सचखंड एक्सप्रेस या रेल्वेने संभाजीनगरला येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी उद्या रविवार, 22 नोव्हेंबरपासून रेल्वेस्टेशनवर मनपाचा दोन पथके तैनात केली जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

कोरोना संसर्गाने दिल्ली शहरात पुन्हा डोके वर काढले आहे. दररोज लक्षणीय संख्येने रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सचखंड एक्सप्रेस ही रेल्वे दिल्लीहून संभाजीनगर मार्गे नांदडला जाते. त्यामुळे या रेल्वेतून संभाजीनगरला येणाNया प्रवाशांवर लक्ष केंद्रीत करण्याचे महापालिका प्रशासनाने ठरवले आहे. या बद्दल माहिती देताना डॉ. पाडळकर म्हणाल्या, रोज सरासरी दोनशे ते अडिचशे प्रवासी या रेल्वेतून संभाजीनगर स्थानकावर उतरतात. या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी उद्या रविवारपासून केली जाणार आहे. सचखंड एक्सप्रेसच्या वेळेत सुरुवातीला मनपाची दोन पथके कोरोना चाचणीसाठी तैनात केली जाणार आहेत. या रेल्वेतून उतरणारा कोणताही प्रवासी कोरोना चाचणी केल्याशिवाय रेल्वेस्टेशनच्या बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासन देखील महापालिकेला मदत करणार आहे. शहरात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या