दोन कोटींचा सागवान जातीचा लाकूड जप्त, शहापूर वनविभागाची सर्वात मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहापूर वन विभागाच्या सहा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी खर्डी वनविभागाच्या मोडकसागर धारण क्षेत्रातील जंगलातील 2 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या सागवान जातीच्या लाकडाची चोरटी तोड पकडली. 200 हुन अधिक कर्मचाऱ्यांना या कारवाईसाठी तैनात करण्यात आले होते.

शहापूर तालुक्यातील खर्डी वनविभागातून सागवान लाकडाची मोठ्या प्रमाणात लाकडी वस्तू बनविण्याऱ्या कारखानदारांना पुरवठा केला जात असल्याची माहिती वन विभागाच्या वन अधिकारी प्रशांत देशमुख यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील कसारा, विहिगाव, वाशालासह अन्य सहा वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल, वनरक्षक, वन मजूर अशी 200 जणांची टीम तैनात करून मोडकसागर धारण क्षेत्रातील जंगलात सर्च ऑपरेशन करण्यात आले. लाकडापासून वस्तू बनविण्यासाठी लागणाऱ्या सागवानी फळ्या, 30 ते 35 फूट लांब लाकडी खांब असे एकूण 2 कोटी पेक्षा जास्त किमतीचे सागवान लाकूड जप्त केले आहे. सर्व किमती लाकूड खर्डी वनविभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आले आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी व्ही, टी. घुले, आर, एच, पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी प्रशान्त देशमुख पुढील तपास करीत आहेत..

दरम्यान कारवाईसाठी गेलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई ठिकाणी काहीजणांकडून दबंगगिरीचा प्रयत्न करण्यात आला. वनविभागाचे अधिकारी देशमुख यांनी केलेल्या कारवाईमुळे वैतरणा धरणात रेती उपसा करणाऱ्या रेती चोरांचे धाबे मात्र दणाणले आहेत.