
राजेश देशमाने । बुलढाणा
सर्वधर्माचे श्रद्धास्थान असलेल्या हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबांच्या यात्रेमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सैलानी दर्गा परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा असंख्य नारळाची होळी पेटवण्यात आली. मुजावर परिवारांच्याहस्ते आज दुपारी ४ वाजता नारळाच्या होळीची पूजाविधी करुन होळी पेटवली. या होळीमध्ये जवळपास १० ट्रक नारळ, ५ पोते खिळे व २०० पोते बिबे जाळण्यात आले.
पेटलेल्या होळीत मनोरुग्ण व भाविक पडू नये म्हणून, पोलिसांनी बॅरीकेटस् लावलेले होते. तसेच पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी डोक्यात हेल्मेटही घातले होते. विदर्भ, मराठवाडा, जळगाव खान्देश, कोकण आणि नजीकच्या आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, केरळ या राज्यातूनही मोठ्या संख्येने व्याधीग्रस्तांना सोबत घेऊन त्याचे नातेवाईक यात्रेमध्ये दाखल झाले आहेत. होळीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. खर्या अर्थाने आज होळीपासून सैलानी यात्रेस सुरुवात झाली आहे.
सैलानी यात्रेमध्ये निंबू, बिबे, गोटे, खिळे, नारळ, काळ्या रंगाच्या छोट्या बाहुल्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. व्यावसायिकांनी नारळामध्ये खिळ्याद्वारे बिबे, गोटे, बाहुल्या, निंबू ठोकून ते नारळ विक्रीसाठी २० ते २५ रुपयात तयार ठेवले आहे. ही नारळे लाखोच्या संख्येत मनोरुग्णांचे अंग-खांद्यावरुन उतरवून होळीमध्ये फेकून जाळण्याचा प्रघात आहे. २३ वर्षापूर्वी सैलानी दर्गा परिसरात लाकूड व ५ नारळाची होळी पेटविली जात होती. परंतु त्यामध्ये हळूहळू बदल होत आज पूर्णपणे नारळाची होळी पेटविली जाते. देशभरातून आलेल्या जमलेल्या लाखो भाविकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी व्याधीग्रस्तांच्या अंग-खांद्यावरुन उतरवून सुई, बिबे, खिळे टोचलेले नारळ होळीत फेकले. होळीत नारळ फेकल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात व मनोरुग्ण बरे होतात असा समज असल्यामुळे ही नारळाची पारंपारीक होळी दरवर्षी सुरु आहे. बंदोबस्तासाठी अधिकारी, पोलीस व होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. यावर्षी अलीकडच्या वीस वर्षातील सर्वात मोठी गर्दी होळी व यात्रेसाठी झाली आहे. लाखोंच्या संख्येने येथे यात्रेकरु, पोलीस व विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित असल्याने संपर्क करण्याचे साधन भ्रमणध्वनी येथे कार्यरत राहत नाही. एवढ्या लोकांचे मोबाईलला नेटवर्क कंपनीकडून देताना अडचणी येत आहे. कोणाचाही मोबाईल कव्हरेज देत नसल्याने लागत नाही. नेटही चालत नाही. फोन लागला तर मध्येच कट होतो. त्यामुळे मोबाईल रेंज असूनही काही फायदा होत नाही.
होळीसाठी सैलानीत पाच लाख भाविक ; वाहतूक व्यवस्था कोलमडली
अपेक्षेपेक्षा यावर्षी होळीला सैलानीमध्ये खाजगी वाहनाने प्रचंड प्रमाणात भाविक आले आहे. जवळपास पाच लाखाच्यावर भाविक आज सैलानी येथे आले होते. या भाविकांनी आणलेले खाजगी वाहने पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा जागोजागी उभी केली. सैलानी पासून ५ ते ७ किलोमीटर दूरपासून वाहनांची गर्दी दाटली. त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. रायपूर ते सैलानी या पाच कि.मी.च्या रस्त्याच्या कडेला वाहनेच वाहन उभी होती. त्यामुळे पळसखेड धरणापासून सैलानी यात्रेत कोणतेच वाहन जात नसल्यामुळे येथून भक्तांना पायी जावे लागत आहे. यावर्षी सैलानी यात्रेत पाणी टंचाई देखील प्रचंड प्रमाणात जाणवत आहे.





























































