
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाची पोलखोल केली. महाराष्ट्र, कर्नाटक निवडणुकीत झालेल्या मतचोरीचा घोटाळा राहुल गांधी यांनी समोर आणला. राहुल गांधी यांनी टाकलेल्या बॉम्बमुळे भारतीय जनता पक्षाच्या अब्रुच्या चिंधड्या उडालेल्या असून त्यांच्यावर तोंड लपवण्याची पाळी आल्याचा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
राहुल गांधी त्यांच्या निवासस्थानी दाखललेल्या प्रेझेंटेशनबाबतही संजय राऊत यांनी माहिती दिली. राहुल गांधी यांनी निवडणुकीतील मतदार याद्यांतील घोटाळ्या संदर्भात दुपारी प्रेझेंटेशन केले होते, मात्र आदित्य ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या निवासस्थानी स्पेशनस स्क्रिन लावून प्रेझेंटेशन दाखवले. हे प्रेझेंटेशन आम्ही शेवटच्या रांगेत बसून पाहिले. कारण तिथून ते उत्तम दिसत होते, असे राऊत म्हणाले.
उत्तम सिनेमा पाहताना आपण शेवटच्या रांगेतील महागडी तिकीटे घेतो आणि बसतो. त्या पद्धतीने आम्ही शेवटची रांग पकडली. प्रेझेंटेशन समजून घेतले. प्रेझेंटेशन झाल्यावर एकत्र भोजन झाले. सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, कमल हसन, मल्लिकार्जुन खरगे असे प्रमुख लोक एका टेबलावर होते. त्यानंतर राहुल गांधी, सुप्रिया सुळे, कनिमोझी, आदित्य ठाकरे, डेरेक ओब्रायन, अभिषेक बॅनर्जी आणि असे आम्ही दुसऱ्या टेबलावर बसलो होतो. बाकी सगळे प्रमुख लोक आमच्या आसपास होते, असेही राऊत यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, यानंतर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात राजकारणाची पुढली रुपरेषा ठरली. महाराष्ट्राच्या राजकारणावरही चर्चा झाली. देशात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही घडामोडी घडू शकतात किंवा घडतील याबाबत आम्ही आशादायी आहोत.
हे शपथपत्र मागतायत, मी संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्ला
नरेंद्र मोदी कशा प्रकारे निवडून आले याचा गौप्यस्फोट राहुल गांधी यांनी केला. किमान 50 लोकसभा मतदारसंघात घोटाळे झाल्याचे त्यांनी उघड केले. खरे म्हणजे या लोकशाहीमध्ये तोंड लपवण्याची पाळी भाजपवर आलेली आहे. राहुल गांधी यांनी बॉम्ब टाकला आणि त्यामध्ये भाजपच्या अब्रुच्या चिंधड्या उडालेल्या आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.