मासे विक्रीच्या नावाखाली गंडा

स्वस्तात मासे देतो असे सांगून व्यापाऱ्यांना फसवणाऱ्या इम्रान कादरी याला साकीनाका पोलिसांनी अटक केली. तो फसवणुकीच्या पैशातून क्रिकेट बेटिंग खेळायचा.

गेल्या वर्षी  तक्रारदाराला ऑनलाईनवर एक नंबर दिसला. व्यावसायिकांना मासे खरेदी करायचे असल्याने त्याने त्या नंबरवर फोन केला. ठरल्यानुसार इम्रानने व्यावसायिकांना माशाचे फोटो पाठवले. त्यानंतर माशाचा ट्रक गुजरात येथून निघाला असल्याचे सांगून 3 लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर तो नंबर बंद येत होता.

 व्यावसायिकाने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक धीरज गवारे, उपनिरीक्षक सुनील चव्हाण, गायकर आणि धनावडे याच्या पथकाने तपास सुरू केला. त्यावरून पोलिसांचे पथक गुजरातला गेले. तिथून इम्रानला  अटक केली.

कोडवर्डचा वापर

इम्रान हा कोडवर्डचा वापर करत असायचा. फोनद्वारे ओळखीने ज्याची फसवणूक झाली आणि  तो ज्या शहराचा रहिवासी असेल त्या शहराचे नाव लिहायचा. तर फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यास त्या व्यक्तीचे नाव आणि सोशल मीडियाचे नाव लिहीत असायचा. पोलिसांनी इम्रानचा मोबाईल हस्तगत केला आहे. त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना काही व्हॉट्सऍप चॅट्स आढळून आले आहेत. इम्रानने मयूर शहा नावाने बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड खरेदी केले होते.