दहशतवादी हल्ले होतच असतात, विमाने पाठवून बदला घेणे योग्य नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा, मुंबई हल्ला यासारखे दहशतवादी हल्ले होतच असतात. म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी सैन्याची विमाने पाठवणे हे योग्य नाही असे धक्कादायक वक्तव्य इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी केले आहे. पित्रोदा एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुलवामानंतरच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे पुरावे सरकारने द्यावेत असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे निवडणूक प्रचाराच्या तोफा धडाडण्याआधीच राजकीय वातावरण तापले आहे.

पित्रोदा यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वसनीय सल्लागार आणि मार्गदर्शक मानले जाते. तसेच ते काँग्रेसच्या ‘जाहीरनामा’ समितीमध्येही आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची संधी साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसवर आज तुटून पडले. पित्रोदा यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना ‘हवाई हल्ल्या’बाबत सवाल उठवले. एअर स्ट्राईकबद्दलचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’सहीत अनेक वृत्तपत्रांतील वृत्तान्त आपण वाचलेत. त्यात एअर स्ट्राईकमध्ये कोणीही मारले गेलेले नाही असेच म्हटले होते असे सांगून ते म्हणाले की, खरोखर हवाई हल्ला करण्यात आला काय, त्यात 300 लोक मारले गेलेत काय? त्यामागील सत्य जाणून घेण्याचा देशाचा नागरिक म्हणून मला अधिकार आहे.

सॅम पित्रोदा यांनी विचारलेले सवाल त्यांचे वैयक्तिक आहेत. भाजपने हिंदुस्थानी जवानांच्या शौर्याला ढाल बनवून बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची दुर्दशा, सदोष जीएसटी हे मोदी सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करू नये.
– रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

विरोधी पक्ष लष्कराचा ऊठसूट अपमान करतोय
पित्रोदा यांनी एअर स्ट्राईकवरून सवाल उठवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तोफ डागली. विरोधी पक्ष हे ऊठसूट लष्कराचा अपमान करत आहेत असा आरोप त्यांनी ट्विटर’वरून केला. उभा देश लष्करासोबत मजबुतीने उभा असून देशवासीय विरोधी पक्षांना त्यांच्या अशा वर्तनाबद्दल कधीही माफ करणार नाहीत असेही ते म्हणाले.