समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया माफी मागा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

सुप्रीम कोर्टाने सोशल मीडिया आणि इन्फ्लुएंसर्सवर कठोर भूमिका घेतली आहे. कोर्टाने स्पष्ट केले की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करून कमाई करणाऱ्या इन्फ्लुएंसर्सचे कंटेंट हे फ्री स्पीचच्या श्रेणीत मोडत नाही. त्यांनी तयार केलेला आशय हा पैसे कमावण्यासाठी केलेला आहे. यासोबतच कोर्टाने स्टँड-अप कॉमेडियन्सना बिनशर्त माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. समय रैनाच्या शोमध्ये रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या विधानामुळे हा वाद उफाळून आला होता.

स्टँड-अप कॉमेडियन समय रैना, विपुल गोयल, बलराज परमारजीत सिंह घई, निशांत जगदीश तंवर, रणवीर अलाहाबादिया, सोनाली ठक्कर उर्फ सोनाली आणि आदित्य देसाई यांच्यावर दिव्यांग व्यक्तींविषयी असंवेदनशील टिप्पणी केल्याचे आरोप झाले होते आणि त्यावरून वाद निर्माण झाला होता. सुप्रीम कोर्टाने या सर्व कॉमेडियन्सना त्यांच्या YouTube चॅनेल आणि पॉडकास्टवर दिव्यांग व्यक्तींना उद्देशून बिनशर्त माफी मागण्याचे निर्देश दिले आहेत.

स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रॉफी (SMA) या आजाराशी झुंजणाऱ्या मुलांच्या कुटुंबीयांनी जे पाऊल उचलले आहे ते अत्यंत धाडसी आहे, असे कोर्ट म्हणाले. त्यांनी समय रैना याच्या टिप्पणीवर आक्षेप घेतला होता आणि हा दिव्यांग मुलांचा अपमान असल्याचे म्हटले होते. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की इन्फ्लुएंसर्स आणि कॉमेडियन्स यांनी केवळ सार्वजनिक माफी मागणेच नाही तर शपथपत्रही सादर करावे, ज्यामध्ये ते आपल्या सोशल मीडियाचा वापर दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी कसा करतील हे नमूद केलेले असावे.

भविष्यात अशा घटनांमध्ये या इन्फ्लुएंसर्सवर दंडही आकारला जाऊ शकतो असा इशाराही कोर्टाने दिले आहे. तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आदेश दिला गेला आहे की त्यांनी सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या भाषेबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत. कोर्टाने सांगितले की ही मार्गदर्शक तत्त्वे कोणत्याही एका घटनेवर घाईघाईने बनवू नयेत, तर तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाशी संबंधित व्यापक मुद्दे लक्षात घेऊन आखावीत. सुप्रीम कोर्टाने हेही स्पष्ट केले की आता कॉमेडियन्सना प्रत्येक सुनावणीत वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याची गरज नाही. मात्र या इन्फ्लुएंसर्सवर योग्य दंड लावायचा की नाही याचा निर्णय नंतर घेतला जाईल.