
गंगापूर तालुक्यातील रांजणगाव नरहरी शिवारातील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवार, ११ रोजी दुपारी घडली.
महालगाव येथील न्यू हायस्कूल शाळेतील नववी वर्गात शिकणारे मयूर किशोर मोईन (१५, रा. थोर वाघलगाव, ता. वैजापूर) व साहिल संतोष झाल्टे (१६, रा. भगूर, ता. वैजापूर) हे दोघे शाळा सुटल्यानंतर पोहण्यासाठी गट क्रमांक २०४ मधील खदानीत गेले होते. दुपारी १ वाजता ते घटनास्थळी पोहोचले होते. संध्याकाळी ते घरी न परतल्याने शोध घेतला. त्यावेळी खदानीच्या काठावर कपडे, पुस्तकांची बॅॉग आणि चपला आढळून आल्या. सायंकाळी ५.३० वाजता अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे इन्चार्ज लक्ष्मण कोल्हे यांच्या पथकाने १५ मिनिटांत दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.
घटनास्थळी गंगापूरचे तलाठी गणेश लोणे, शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोजने, बीट अंमलदार बिघोत, तसेच पोलीसपाटील कडू म्हस्के हे उपस्थित होते. या प्रकरणाचा पुढील तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत.
कारवाईदरम्यान गंगाधर म्हस्के, कचरू नाईक, अविनाश गलांडे, अमोल मलिक, मधुकर वालतुरे आणि गौतम अल्हाड यांनी सहकार्य केले. या घटनेने थोरवाघलगाव परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी या खदानीभोवती सुरक्षेची प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.