अभिप्राय- परिपूर्ण शायरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>साबीर सोलापुरी

पनवेलचे ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांचा ‘दिवान-एके’ हा दुसरा दिवान नुकताच प्रकाशित झाला. गझलसंग्रह आणि दिवान यांच्यातील मूलभूत तफावत अशी दर्शविता येऊ शकते की, अनेकविध गझलांच्या समुच्चयाला गझलसंग्रह म्हणतात. गझलसंग्रहात गझलमधील मुळाक्षरातील सगळ्या अक्षरांनी बांधलेल्या गझला असतात. तर दिवानमध्ये ‘अ’पासून ‘अ:’पर्यंत ‘क’पासून ‘ज्ञ’पर्यंतची सर्व मुळाक्षरे असतात. यातील साऱयाच गझलांमधील रदीफमध्ये निर्धारित शब्दांचे अखेरचे अक्षर म्हणून आणण्यात जाणीवपूर्वक प्रयत्न गझलकारास करावा लागतो. त्यालाच ‘गझल दीवान’ असे संबोधण्यात येते. दीवान म्हणजे गझलकाराच्या गझलांचा परिपूर्ण प्रवास असतो. त्याला ‘मूकम्मल सफर’ म्हणतात.

पूर्वीच्या काळात गझलसंग्रह प्रसिद्ध करण्याऐवजी दीवान प्रसिद्ध करण्याचा रिवाज होता. या दीवानालाच शायराचे नाव जोडलेले असायचे. जसे की… दीवाने-ए-मीर, दीवान-ए-गालिब, दीवान-ए-दाग. गझलसंग्रहास वेगळे शीर्षक देण्याचा प्रघात नव्हता. अलीकडच्या काळात मराठीमध्येही दीवान प्रसिद्ध होऊ लागले आहेत. गझलसंग्रहाच्या तुलनेत दीवान पूर्ण करणे अत्यंत जिकिरीचे आणि जोखमीचे काम आहे. गझलकारांची शब्दांवर, छंदावर, वृत्तावर, तंत्रावर हुकमत असावी लागते. यात खऱया अर्थाने शायराच्या प्रतिभेचा, व्यासंगाचा, अभ्यासाचा, बहुश्रुततेचा कस लागत असतो. प्रस्तुत ‘दीवान-एके’मध्ये जवळपास चाळीस वृत्तांचा अंतर्भाव आहे. एकूण 207 गझलांचा हा समुच्चय आहे.

या दीवानमध्ये विषयांचे मोठे वैविध्य आहे. प्यार, प्रणय, मुहब्बत, इश्क, मीलन, विरह आदींसारख्या प्रेमविषयक भावभावनांची बरेच रेलचेल आहे. शिवाय राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, नैसर्गिक, वांङ्मयीन, सणवार अशा विभागवार विषयांची मुक्त पखरण आहे. गझल हाच एकेंचा श्वास अन् ध्यास. त्यांनी गझलेला वाहून घेतले आहे. गझल त्यांच्यासाठी अक्षरांची, भावनांची पालखी आहे. त्या पालखीचा भोई होण्यातच त्यांना धन्यता वाटते. ते म्हणतात…
अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी
गझल म्हणजे गच्च ओल्या भावनांची पालखी
अेकेंची खासीयत अशी की, ते ज्या पद्धतीनं सामाजिक अंगानं प्रभावीपणे व्यक्त होतात, त्याचप्रमाणे प्रेम जगतातल्या तरल, हळव्या काळजाला साद घालणाऱया गझलाही तितक्याच उत्कटतेनं लिहितात. मी कोरले तुझेच नाव काळजावरी
तू पाहिलास अंत कालचीच गोष्ट ही दिवाळी हा अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा सण. त्याच्यावर कुणालाच मालकी सांगता येत नाही. म्हणून हिंदुस्थानी उत्सव परंपरेत सर्व सणांमध्ये दिवाळीचं स्थान आगळेवेगळं आहे. एकेंच्या शेराचा हा मथितार्थ आहे.

आनंदाचा सण हा दीपावलीचा सण हा
हा सण तर सर्वांचा तुमचा अमुचा सण हा
गझलकाराच्या लेखन वळणावरून, शैलीवरून त्याची स्वतची ओळख निर्माण होत असते. दुर्बोधता, क्लिष्टता टाळून एके सहज, साधीसोपी गझल लिहितात. सहजता, प्रासादिकता हीच त्यांच्या गझल सृजनाची ठळक ओळख आहे.

दीवान-ए-एके : गझल दीवान
गझलकार : ए. के. शेख
प्रकाशक : शब्दान्वय प्रकाशन
पृष्ठे : 227, मूल्य : 300 रुपये