‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये विडंबन; समीर वानखेडेंनी खान पिता-पुत्राला हायकोर्टात खेचलं, 2 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याने दिग्दर्शित केलेली ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ही वेब सीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. या सीरिजमधील एक दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक करणारे माजी नार्कोटिक्स अधिकारी समीर वानखेडे यांचे विडंबन करण्यात आले आहे. या प्रकरणी आता समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वानखेडे यांनी खान पिता-पुत्राला हायकोर्टात खेचत मानहानी प्रकरणी 2 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

माजी नार्कोटिक्स अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, नेटफ्लिक्स आणि इतरांविरिद्ध दिल्ली उच्च न्यायालयामध्ये मानहानीचा खटला दाखल केला आहे. ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजमध्ये जाणूनबुजून त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने खोटा आणि बदनामीकारक प्रसंग चित्रित करण्यात आला आहे, असा आरोप वानखेडे यांनी केला असून मानहानी प्रकरणी 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. ही रक्कम कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याचा त्यांना मानस आहे. शाहरूख खान किंवा त्याच्या टीमने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजच्या माध्यमातून पक्षपाती आणि बदनामीकारक पद्धतीने चित्रण करण्यात आले असून या सीरिजमध्ये ड्रग्जविरोधी अंमलबजावणी संस्थांना दिशाभूल करणाऱ्या आणि नकारात्मक दृष्टीकोनातून दाखवण्यात आले आहे. यामुळे जनतेचा या संस्थावरील विश्वास कमी होऊ शकतो. तसेच या सीरिजमधील एक पात्र सत्यमेव जयते म्हणते आणि त्यानंतर लगेचच अश्लील हावभाव करते. यामुळे राष्ट्रीय चिन्हाचा भाग असलेल्या घोषणेचा अवमान होतो आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा 1971 नुसार हा दंडनीय गुन्हा आहे, असाही दावा करण्यात आला आहे.