समीर खान यांना तीन सुवर्ण, दोन रौप्य

ग्रामीण पोलीस हवालदार समीर खान यांनी राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या 44 व्या राष्ट्रीय अजिंक्यपद मास्टर्स अॅथलेटिक्स स्पर्धेत 45 वर्षे वयोगटात तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदके जिंकत आगामी आंतरराष्ट्रीय मास्टर्स ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघातील आपले स्थान निश्चित केले आहे. युवरानी ऍथलेटिक्स समिती आयोजित स्पर्धेत समीरने 110 मीटर्स हर्डल्स शर्यतीत 21.54 सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांक मिळवला. त्यानंतर समीरने 400 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत 1ः07ः00 मिनिटे अशा कामगिरीसह पहिला क्रमांक मिळवला. महाराष्ट्राच्या आणि वैयक्तिक आपल्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा करताना 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत 57ः38 सेकंद अशी वेळ नोंदवली. 100 मीटर धावण्याची शर्यत आणि भालाफेकीत मात्र समीरला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत समीरने 12ः69 सेकंद अशी वेळ नोंदवली. भालाफेकीत 28ः78 मीटर अशी फेक करत समीरने आपल्या खात्यात पाचवे पदक पक्के केले.