समृद्धी महामार्गाच्या जोड रस्त्यावर भगदाडे, खुटघर ते शहापूर मार्गावर जीवघेणा प्रवास

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा इगतपुरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 जून रोजी होत आहे. मात्र समृद्धी महामार्गाची शहापूर एक्झिट असलेला खुटघर ते शहापूर येथील मुंबई-नाशिक जुना महामार्गापर्यंतचा रस्ता पूर्णतः खड्यात गेला आहे. या मार्गावरून अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाचे एक्झिट असलेले रस्तेदेखील आपल्या ताब्यात घेऊन तेथील रस्ते व पूल चांगल्या दर्जाचे करण्याचे योजले होते. त्यामुळे शहापूर ते मुरबाड असलेला रस्ता महामंडळाने आपल्या ताब्यात घेऊन हा रस्ता सिमेंटचा करण्यास सात वर्षांपूर्वी सुरू केले होते. मात्र ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत हा रस्ता पूर्णत्वास गेलेला नाही. समृद्धीची शहापूर एक्झिट असलेला खुटघर- दोऱ्याचा पाडा येथून शहापूरकडे येणारा सिमेंटचा रस्ता जागोजागी अपुरा ठेवला आहे. रस्ते विकास महामंडळाने समृद्धी उ‌द्घाटनाआधी या पुलावर संरक्षित उपायोजना करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पूल मजबूत केला नाही तर महाड येथील सावित्री नदीवरील अपघाताची पुनरावृत्ती येथे घडण्याची भीती आहे.

इमर्जन्सी एक्झिटची गरज
समृद्धी महामार्गावर असलेले कसारा ते इगतपुरी दरम्यानचे महाकाय बोगदे असताना या महामार्गाला कमी प्रमाणात एक्झिट आहेत. या महामार्गावर कसारा येथे एक्झिट ठेवणे गरजेचे होते. मात्र अधिकारी आणि ठेकेदाराने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

ब्रिटिशकालीन पूल धोकादायक
सापगाव येथील भातसा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल हा अखेरच्या घटका मोजत असून नदीवरील दोन्ही बाजूला संरक्षक कठडे नाहीत, रात्रीच्या वेळी पूर्णतः अंधार असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याच रस्त्यावर शहापूरकडे येत असताना कांबारे पॉवर हाऊसजवळ असलेल्या आवरी नदीवरील पूलदेखील असाच धोकादायक आहे.