मातीतले खेळ

345

बाळ तोरसकर,[email protected]

रस्सीखेच् खेळाचा उगम खूपच प्राचीन आहे… हा खेळ हिंदुस्थानात फार पूर्वीपासून खेळत असल्याचे दाखले इतिहासात सापडतात…

मानवाचा जन्म हा एकमेकांवर जय–पराजय, कुरघोडी करण्यासाठीच झालेला आहे हे खेळात पदोपदी जाणवते. पूर्वी मैदानी खेळांची चलती होती. घराघरातील एक तरी युवक कोणत्या ना कोणत्या खेळात पारंगत असायचा. त्यातूनच पुढे आलेला एक खेळ म्हणजे रस्सीखेच. मागच्या लेखात आपण पाहिलेच आहे की या खेळात उडणारी तारांबळ, होणारी घसराघसरी व वापरली जाणारी ताकद हे आपले शरीर दणकट, पीळदार तर होतेच त्याचबरोबर शरीराला लवचिकता व ताठरपणासुद्धा प्राप्त होतो. आपल्याकडे हा खेळ शाळा-महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनांतून व अन्य उत्सवप्रसंगी, तसेच गावांच्या जत्रांच्या उत्सवप्रसंगी देखील खेळला जातो.

खरे तर रस्सीखेच खेळाचा उगम खूपच प्राचीन आहे. हा खेळ हिंदुस्थानात फार पूर्वीपासून खेळत असल्याचे दाखले इतिहासात सापडतात. या खेळाची सुरुवात चार हजार वर्षांपूर्वी ओरिसात झाल्याचे बोलले जाते. त्याचा पुरावा म्हणजे तितक्याच जुन्या असलेल्या सूर्य मंदिराच्या भिंतीवर असलेली रस्सीखेच खेळाची चित्रे रेखाटल्याची आपल्याला आजही पाहायला मिळतात. चीनमध्ये सुगीच्या दिवसांत मोठमोठे स्फिंक्ससारखे दगड ओढण्याचे काम गुलामांकडून करवून घेतले जाई, तसेच कधी कधी खलाशांना शिडे चढविण्यासाठी दोर खेचावे लागत असे. हिंदुस्थानातसुद्धा पूर्वी अवजड तोफा जाडजूड दोरखंडाने ओढण्याचे काम चालत असे. यातूनच रस्सीखेच या खेळाचा उगम झाला असावा. या खेळात केवळ भारी वजनामुळेच संघ जिंकतो असे नव्हे तर खेळाडूंच्या दणकट मांडय़ा, दंड, दमदारपणा, झटकन होणारी प्रतिक्रिया, एकाग्रता, संघभावना या गुणांच्या जोरावर कोणताही संघ जिंकू शकतो.

इंग्लंडच्या ग्रामीण भागातून आलेला हा खेळ 1880 पासून ऍथलेटिक्स प्रकारात खेळला जाऊ लागला. 1900 साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत या खेळाचा समावेश झाला. स्वीडिश ज्ञानकोशात रस्सीखेचमधील पहिला विजय स्वीडन-डेन्मार्कच्या संयुक्त संघाने मिळवल्याची नोंद सापडते. नंतर अमेरिका व इंग्लंड या संघांनी स्वीडनवर विजय मिळवल्याच्या नोंदीही सापडतात. 1920-30 नंतर हा खेळ ऑलिंपिक क्रीडस्पर्धांतून वगळला. 1958 साली इंग्लंडमध्ये ‘टग ऑफ वॉर’ या संघटनेची स्थापना करण्यात आली.

या खेळात दोन प्रतिस्पर्धी संघ आपापली ताकद अजमावण्याच्या उद्देशाने एक जाड दोर परस्परविरुद्ध दिशांना खेचून धरीत प्रतिस्पर्ध्याला आपल्या हद्दीत ओढण्याचा प्रयत्न करतात. या स्पर्धेसाठी सुमारे दहा ते बारा सें.मी. जाडीचा वाखाचा मऊ दोर वापरतात व त्याची लांबी 32 मीटर असते. या दोराच्या मध्यभागी रंगीत फीत बांधलेली असते. या रंगीत फितीच्या दोन्ही बाजूंना दोन मीटर अंतरावर पांढऱया फिती बांधलेल्या असतात. या तिन्ही खुणांच्या अगदी खाली मैदानावर खुणा केलेल्या असतात. स्पर्धा सुरू होताना दोराला असलेल्या फिती व जमिनीवरच्या खुणा वरून पाहिल्या असता एकमेकांसमोर आल्या पाहिजेत. प्रत्येक संघातील पहिल्या खेळाडूने आपली पकड त्याच्या बाजूकडील पांढऱया फितीपासून 30 सें.मी. अंतराच्या आतच केली पाहिजे. जो संघ प्रतिस्पर्धी संघाच्या जवळ असलेली खूण आपल्या बाजूकडील जमिनीवर असलेल्या खुणेच्या बाजूला खेचून आणेल तो संघ विजयी ठरतो. यासाठी सर्वोत्तम संघाला विजयी होण्यासाठी त्यांना तीन संधी दिल्या जाऊन विजयी संघ घोषित केला जातो. साधारणपणे संघातील खेळाडूचे वजन करताना कमीत कमी कपडय़ांसह वजन केले जाते. मात्र या खेळात खेळाडूंचे वजन त्यांच्या बूटमोजे, जर्सी, कोट यांच्यासह घेतले जाते. साधारणपणे संघाचा वजनी गट 559 ते 711 किलोग्रॅम (88 ते 112 स्टोन) असा असतो व प्रत्येक खेळाडूचे वजन त्याच्या दंडावर नमूद केले जाते.

उजव्या बाजूला दोर खेचून धरला असता डावा पाय पुढे असतो व तोही 350 अंशांच्या कोनात. एक विशिष्ट झटका देऊन एकदम सगळे वळतात व हातातील दोर खांद्यावर घेऊन तोंडे उलट दिशेला करून ओढण्यास सुरवात करतात. सुरुवातीला सर्वांच्या उजव्या बगलेखाली दोर ओढून ठेवतात. या खेळात शेवटच्या खेळाडूवर बरीच भिस्त असते. तशीच ती पहिल्या खेळाडूवरही असते. शेवटच्या खेळाडूच्या एका खांद्याखालून व दुसऱया खांद्यावरून दोर जाऊन तो दोर थोडा जमिनीवर लोळला पाहिजे. शेवटचा गडी साधारणपणे सर्वात वजनदार असतो व त्याला ‘अँकरमन’ असे म्हणतात. अँकर म्हणजे बोटीचा नांगर. तो जमिनीत रुतवला की बोट हलू शकत नाही याचवरून ही संज्ञा आली असावी असे म्हटले जाते. या खेळात कोणत्याही खेळाडूने हेतूपूर्वक बैठक मारून खाली बसणे हे नियमाविरुद्ध आहे. तसेच हा खेळ मैदानाप्रमाणे इंडोर हॉलमध्येसुद्धा खेळता येतो. त्यासाठी दणकट गाद्यांचा वापर केला जातो.

 

आपली प्रतिक्रिया द्या