डहाणूच्या समुद्रात रेतीमाफियांचा ‘रात्रीस खेळ चाले’; चिंचणी ते घोलवडपर्यंत बेकायदा उपसा

पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या डहाणू तालुक्यात चिंचणी ते घोलवडपर्यंतच्या समुद्रकिनारपट्टीवर गेल्या काही महिन्यांपासून रेतीमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आदिवासी मजुरांना पैशाचे आमिष दाखवून रात्रभर बेकायदेशीर रेती उपसा केला जात आहे. ही रेती मोठ्या प्रमाणावर ट्रकद्वारे डहाणूतील ठेकेदारांना पुरवठा केली जात आहे. बेसुमार रेती उपशामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे.

पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले चिंचणी, वरोर, वाढवण, गुंगवाडा, तड्याळे, घा. डहाणू, डहाणू गाव, पारनाका, आगर, नरपड, चिखला आणि घोलवड या किनारपट्टीच्या भागात दररोज रात्री अवैधरीत्या रेती उत्खनन सुरू असल्यामुळे समुद्रकिनारी मोठाले खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमुळे समुद्र भरतीच्या वेळी पाणी थेट गावांत शिरण्याचे प्रमाण वाढले असून स्थानिकांसाठी धोक्याचे ठरत आहे. रेती उपशासाठी काही माफिया आदिवासी मजुरांचा वापर करून स्वतः पडद्याआड राहून व्यवसाय करत आहेत. काही ठिकाणी बैलगाड्यांनी तर अनेक भागांत दहा ते पंधरा ट्रक दररोज रेती भरून नेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत तहसीलदार सुनील कोळी यांच्याशी संपर्क साधला असता बेकायदा रेती उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल इतकेच सांगितले.

रॉयल्टी बुडवून करोडोंची लूट
डहाणूचे तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी आणि तहसीलदार अभिजित देशमुख यांनी या बेकायदेशीर रेती उत्खननावर कडक कारवाई केली होती. मात्र सध्या पुन्हा एकदा रेतीमाफियांचे नेटवर्क सक्रिय झाले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून रॉयल्टी बुडवून करोडो रुपयांची लूट सुरू आहे.