
>> संदीप वाकचौरे
विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया मानला जातो. तशाच प्रकारे व्यवसाय, उद्योग, व्यवस्था, राजकारण, अर्थकारण, परराष्ट्र संबंध यांमध्येही विश्वास महत्त्वाचा असतो, परंतु बदलत्या काळात विश्वासनिर्मितीच्या प्रक्रियेसाठीचे प्रयत्न कमी होत चालल्याने विश्वासतूट वाढत चालली आहे. ‘इप्सॉस ग्लोबल ट्रस्ट वर्दीनेस इंडेक्स, 2023’ चा ताजा अहवाल हेच सूचित करणारा आहे. या अहवालानुसार भारतातील विविध सेवा क्षेत्रांतील लोकांवरील विश्वास सातत्याने कमी होत असल्याचे समोर आले आहे. आपल्या देशात असा एकही पेशा नाही की,ज्यावर लोकांचा पूर्णतः विश्वास आहे. साधारण पन्नास टक्क्यांच्या आसपास शिक्षक, डॉक्टर आणि वैज्ञानिक यांच्यावर विश्वास व्यक्त झाला आहे.
‘इप्सॉस ग्लोबल ट्रस्ट वर्दीनेस इंडेक्स, 2023’चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्या अहवालानुसार भारतातील विविध सेवा क्षेत्रांतील लोकांवरील विश्वास सातत्याने कमी होत असल्याचे समोर आले आहे. आपल्या देशात असा एकही पेशा नाही की, ज्यावर लोकांचा पूर्णतः विश्वास आहे. साधारण पन्नास टक्क्यांच्या आसपास शिक्षक, डॉक्टर आणि वैज्ञानिक यांच्यावर विश्वास व्यक्त झाला आहे. ज्यांच्या हाती देशाचे भविष्य आहे, जे लोकशाहीचे स्तंभ मानले जातात अशा लोकशाहीतील राजकीय नेतृत्व आणि प्रसारमाध्यमात काम करणारे पत्रकार यांच्यावरील विश्वासाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. हा अविश्वास लोकशाहीच्या व्यवस्थेसाठी घातक ठरणारा आहे. आज आपण लोकशाही व्यवस्था भक्कम करण्यासाठीची पावले टाकत आहे. मात्र राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी जनतेचा विश्वास गमावल्यास त्यांच्या धोरणाची अंमलबजावणीची प्रक्रिया गतीमान कशी होणार? राष्ट्र प्रगतीची पावले टाकून विकासाकडे झेप कशी घेणार ? त्याच वेळी पत्रकार जे काही करताहेत ती प्रत्येक गोष्ट राष्ट्रविकासाची आहे. त्यांचे काम समाज प्रबोधन आहे. त्यातून उन्नत आणि प्रगत समाज उभा करायचा आहे. अशा वेळी आपण या क्षेत्रातील विश्वास गमावणे हे उद्याच्या भविष्यासाठी निश्चित चिंतनीय आहे.
आपल्याला ज्या क्षेत्रात यश मिळवायचे आहे, त्या क्षेत्रातील मनुष्यबळाचा एकमेकांवर विश्वास असायला हवा असतो. अविश्वासाच्या वातावरणात प्रगतीचा आलेख फार उंचावत नाही. जगातील विविध व्यावसायिक क्षेत्रांतील कार्यरत असणाऱ्या लोकांवर नागरिकांचा किती विश्वास आहे हे त्या अहवालाने दर्शित केले आहे. या अहवालासाठी निवडण्यात आलेला नमुना हा जगभरातील 31 आहे. प्रतिसादकांच्या मताच्या आधारे हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर अधिकाधिक विश्वास डॉक्टरांवर व्यक्त झाला आहे. भारतात मात्र डॉक्टर तिसऱ्या स्थानावर आहेत. वैद्यकीय क्षेत्रात जे काही प्रकार जनतेच्या समोर येत आहेत, त्यामुळे अविश्वास व्यक्त होत आहे. कोरोनाच्या काळात या क्षेत्रात सामान्यांची जी लुटमार झाली, फसवले गेले, कट प्रॅक्टिसच्या नावाखाली जे काही सुरू आहे, त्यातून सामान्यांचा विश्वास गमावणे घडत आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर भारतीयांना नेहमीच देव वाटत आले आहेत. शंभर टक्के विश्वास ठेवणारी पिढी या भूमीने पाहिली आहे. सध्या जे काही समोर येते आहे, त्याचा तो दुष्परिणाम म्हणून विश्वास गमावणे घडत आहे. गेल्या काही वर्षांत वैद्यकीय सेवेत पैसा वर्चस्व गाजू लागला आहे. सेवाभाव कमी होत आहे. वैद्यकीय शिक्षण महाग होत असल्याने पैसा ओतून शिक्षण घेणारी पिढी पैसा मिळवण्यासाठी वाममार्गी चालत आहे. हे एक चक्रच आहे. मात्र या चक्राचा परिणाम म्हणून विश्वास गमावणे घडते आहे. या क्षेत्रात सामान्यांना आधार मिळण्याची आशा धूसर बनत आहे. विश्वासच रुग्णाला आजारपणातून बाहेर काढत असतो. ग्राहक आणि विव्रेता हे नाते विश्वासनिर्मितीतूनच अधिक भक्कम करत जाणारे ठरेल.
जागतिक स्तरावर शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांवर विश्वास असण्याचे प्रमाण तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात विविध व्यावसायिकांपैकी सर्वाधिक विश्वास असणारा शिक्षकी पेशा हा प्रथम स्थानावर आहे. जपान आणि दक्षिण कोरिया वगळता जगातील इतर देशांतील नागरिकांचा शिक्षकांवर अधिक विश्वास असल्याचे दिसून आले आहे. भारतातील विविध पेशांतील लोकांवरील विश्वासासंदर्भातील प्रमाणाचा विचार करता दुसऱ्या स्थानी सशस्त्र दल आहे . त्यांच्यावर 52 टक्के लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे. तिसऱ्या स्थानी डॉक्टर असून त्यांच्यावर 51 टक्के लोकांनी विश्वास प्रदर्शित केला आहे. भारतातील वैज्ञानिकांवर 49 टक्के, न्यायाधीशांवर 46 टक्के, महिलांवर 46 टक्के, बँकर 45 टक्के, पाद्री आणि पुरोहित 34 टक्के,पोलीस 33 टक्के,सरकारी कर्मचारी 32 टक्के, वकील 32 टक्के आणि पत्रकार 30 टक्के इतके विश्वासाचे प्रमाण आहे. जागतिक पातळीवर विश्वासाचे प्रमाणाचा विचार करता डॉक्टरांवर 58 टक्के विश्वास आहे, तर वैज्ञानिकावर 57 टक्के विश्वास असल्याचे दिसून येत आहे. त्या खालोखाल शिक्षक 53 टक्के, सशस्त्र्ा दलावरही 53 टक्के विश्वास आहे. भारतात पॅबिनेट मंत्री आणि सरकारी अधिकारी यांच्यावर 39 टक्के आणि राजकारण्यांवर 38 टक्के विश्वास व्यक्त झाला आहे. जगात 60 टक्के लोकांनी राजकारण्यांना सर्वात अविश्वासू मानले आहे. जे राज्यकर्ते देशाच्या विकासाचे धोरण आखतात, त्यांच्यावर विश्वास नसेल तर विकासाचे चाक गती कशी घेणार? हा प्रश्न आहे. येथील राजकारण्यांसाठी अविश्वास हा धोक्याचा इशारा आहे.
भारतात शिक्षकांवर विश्वासाचे प्रमाण 53 टक्के असल्याचे अहवालातून समोर आले आहे. 47 टक्के लोकांचा विश्वास गमावणे झाले आहे. त्याचा विचार प्रत्येकाने करण्याची नितांत गरज आहे. शेवटी शिक्षकांवरील विश्वास हा सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत अधिक महत्त्वाचा धागा आहे. शिक्षणातून केवळ अक्षराची साक्षरता नाही, तर उद्याचे राष्ट्र घडण्याची पायाभरणी होत असते. त्यामुळे तेथे कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाची विश्वासार्हता अधिक वाटायला हवी. राजकारणी देशाचे धोरण आखत असतात. विकासाची चाके गतीमान करणारी ती माणसं आहेत. मात्र त्यांच्यावर जर विश्वास नसेल तर ती ज्या व्यवस्थेवर स्वार आहेत त्या व्यवस्थेबद्दल जनमानसात प्रश्नचिन्ह आहे. राजकारणी विकासाभिमुख असतात, त्यांच्या धोरणात राष्ट्र व समाजहित सामावलेले असते ही धारणा जनसामान्यांच्या मनात पक्की व्हायला हवी आहे. राजकारणी जनतेच्या अधिक विश्वासाला पात्र ठरायला हवा. मात्र दुर्दैवाने लोकशाहीत मतासाठी, सत्तेसाठी सर्व काही असा विचार करत होणाऱ्या निवडणुका, होणारी भाषणे, दिली जाणारी आश्वासने, निवडणुकांदरम्यान होणारे निर्णय, राजकीय हितासाठी धर्माधर्मांत, जातीपातींत होणारे संघर्ष हे सारेच जनता अनुभवत असते. वेळ आली तर केवळ निवडणुकीचा जुमला म्हणून त्याकडे राजकारणी दुर्लक्ष करत जातात; पण या सर्व प्रक्रियेचे फलित म्हणून राजकारण्यांवरील अविश्वास वाढत जाणे असते हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे राजकारणी जे काही निर्णय घेतात ते सामान्यांसाठी नाही, तर मतासाठी घेतात ही धारणा जनमताची पक्की होत चालली आहे. ते अधिक धक्कादायक आहे. राजकारण्यांवरील अविश्वासामुळे नागरिकांची लोकशाहीतील सक्रियता कमी होण्याचा धोका आहे. त्यातून मतदानाचा टक्कादेखील घसरला जाऊ शकतो. हा अविश्वास असाच वाढत गेला तर त्याचे परिणाम भविष्यात राष्ट्राच्या विकासावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील सर्वच क्षेत्रांतील लोकांनी आपला विश्वासाचा टक्का उंचावला नाही तर विकासाच्या प्रक्रियेपासून नागरिक दुरावण्याची शक्यता आहे. सरकारच्या योजनांमध्ये जर लोकांचा सहभागाचा टक्का उंचावला नाही तर सरकारी योजनांशी जनतेचे नातेच टिकणार नाही. अविश्वासाचा अंधकार नष्ट करून विश्वासाचा प्रकाश निर्माण केल्याशिवाय येथील सामान्य जनतेच्या आयुष्यात विकासाची प्रकाशकिरणे पोहोचणार नाहीत. त्यामुळेच अधिक गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. हा अविश्वास सर्वच क्षेत्रांतील मनुष्यबळाला विचार करायला लावणारा आहे.
(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ-विचारवंत आहेत)

























































