
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एका ॲसिड कारखान्यात दुपारी साडेबाराच्या सुमारास स्फोट झाल्याने मोठी आग लागली. यावेळी बचावकार्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस कर्मचारी अभिजित पाटील, प्रवीण हुक्किरे, सुभाष पाटील अशी जखमींची नावे आहेत.
द्वारकानगर-कुपवाड रोड परिसरातील मिलिंद मारुती बाबर यांच्या ‘मिलिंद केमिकल मार्केटिंग फॅक्टरी’त हा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज ऐकताच गांधी चौकी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. ऑसिडसाठय़ाने अचानक पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. या फॅक्टरीशेजारी रहिवासी घरे असल्याने तेथील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवून घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारीही किरकोळ जखमी झाले. या फॅक्टरीमध्ये असलेल्या सुमारे 300 किलो ॲसिडने पेट घेतला होता. अग्निशमन दलाचे अधिकारी पवार, माळी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग विझविली.
दरम्यान, या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या फॅक्टरीचे मालक मिलिंद बाबर हे पूजा करीत असताना आग लागल्याचे त्यानी सांगितले. या ठिकाणी ज्वलनशील पदार्थांचा साठा असताना, त्या मालकाने अग्निशमन परवानगी घेतली आहे की नाही, याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, असे अधिकारी विजय पवार यांनी सांगितले.




























































