
दुर्मिळ वन्य प्राण्यांपैकी एक आणि वेगळ्या रुबाबाचा ‘बगीरा’ अर्थात ब्लॅक पँथरचे (बिबट्या) आज संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथे दर्शन झाले. आज सकाळीच या भागात त्याचा वावर असल्याचा व्हिडिओ ग्रामस्थांनी सोशल मीडियावर शेअर केला. वन विभागाने त्याला दुजोरा दिला. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभाकडून आज सायंकाळी तेथे कॅमेरे लावण्यात येत असल्याचे वन विभागाने सांगितले. ब्लॅक पँथर ही बिबट्याची जात आहे. मात्र त्याचा रंग पूर्ण काळा म्हणून तो विशेष आणि दुर्मिळ आहे.
यापूर्वी राजापूर तालुक्यात विहिरीत पडलेल्या ब्लॅक पँथरला जीवदान देण्यात आले होते. त्यानंतर गुहागरमध्ये एका ब्लॅक पॅन्थरचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. आता संगमेश्वर तालुक्यात ब्लॅक पँथरचा वाढता वावर चर्चेचा विषय बनला आहे. कोंडीवरे येथील जंगलात ब्लॅक पँथरचे अनेकांना दर्शन झाले. ग्रामस्थांनी त्याचा व्हिडिओ केला असून तो वन विभाग आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. याबाबत रत्नागिरी वन अधिकार्यांशी चर्चा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. गुहागर, राजापूरनंतर आता संगमेश्वर तालुक्यातही ब्लॅक पँथर आढळून आला ही पर्यावरणप्रेमीना आनंदाची बाब आहे.
कोंडिवरे येथे ब्लॅक पँथर आढळला असून व्हायरल झालेला व्हिडिओ खरा आहे. आपणच हा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला होता त्यानुसार आज वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कोंडिवरे येथे दाखल झाले असून त्यांनी त्याचा वावर असणाऱ्या ठिकाणी कॅमेरे लावले आहेत, असे कोंडिवरेचे सरपंच जाकीर शेकासन यांनी सांगितले.
कोंडीवरे (ता. संगमेश्वर) येथे आज ब्लॅक पँथरचे दर्शन झाल्याची माहिती खरी आहे. त्या भागात त्याचा वावर असल्याची माहिती होती. त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी लवकच तेथे कॅमेरे लावण्यात येणार आहेत, असे रत्नागिरी परिक्षत्र विभागाच्या वन अधिकारी प्रियांका लगड यांनी सांगितले.




























































