
बहुचर्चित संगमेश्वर साखरपा या 32 किमी मार्गाचे रखडलेले काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे 32 कोटी रुपये खर्चाच्या या मार्गाचे कारपेट करण्याचे काम सुरु झाले असल्याने आता संगमेश्वर कोल्हापूर मार्गावरील प्रवास सध्या निदान साखरप्यापर्यंत तरी सुसाट होणार असल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सुमारे तीन वर्षे संगमेश्वर साखरपा या राज्य मार्गाच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. पावसाळ्यात या मार्गावर पडणारे खड्डे हा वाहनचालकांच्या डोके दुखीचा भाग होता. एवढेच नव्हे तर, साईडपट्टीचा पत्ताच नसल्याने या मार्गावरुन पादचाऱ्यांना चालणे खूप अवघड होत असे.
या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रथम हाती घेण्यात आले. त्यानंतर आवश्यक ठिकाणी नव्याने मोऱ्या टाकण्यात आल्या. मात्र लॉकडाऊनमध्ये हे काम जवळपास दोन महिने रखडले होते. विशेष परवानगीने बीबीएम पध्दतीचे डांबरीकरण गतवर्षी पूर्ण करण्यात आले होते.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी हा रस्ता आणि विशेष करुन सर्वच मोऱ्या खचल्याने वाहनचालकांना पुन्हा एकदा मनस्तापाला सामोरे जावे लागत होते. याबरोबरच साईडपट्टीवर वाढलेली झाडी न तोडल्याने पादचाऱ्यांना अक्षरशः जीवावर उदार होऊन रस्त्यावरुन चालण्याची वेळ येते.
या गैरसोयीमुळे या 32 किमी लांबीच्या मार्गाचे अपूर्ण असलेले कारपेटचे काम पूर्ण करण्याची मागणी वाहनचालकांसह काही सामाजिक संस्थानी केली होती. अखेरीस या कामाला मुहूर्त मिळाला असून संगमेश्वर पासून कार्पेट करण्याचे काम सुरु झाले असल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. आता थोड्याच दिवसात संगमेश्वर ते साखरपा मार्गावरील प्रवास सुसाट वेगाने होणार आहे.
साइडपट्टीवरील झाडी तोडावी
संगमेश्वर साखरपा या राज्य मार्गावरील 32 किमी लांबीच्या रखडलेल्या कारपेट करण्याचे काम सुरु झाले ही बाब स्वागतार्ह असली तरी, रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्टीवर वाढलेली प्रचंड झाडी लक्षात घेता पायी जाणाऱ्या प्रवाशांना समोरुन भरधाव वेगाने वाहन आल्यास अक्षरशः जाळीत घुसावे लागते. यामुळे अनेकांच्या पायाला अंगाला काटे, कसवे लागतात. ही झाडी तोडावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


























































