
संगमनेर नगरपरिषदेतील मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत. मात्र, या स्ट्राँग रूमवर नियंत्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे आज जवळपास तासभर बंद झाल्याची माहिती समजताच सर्व उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूममध्ये संगमनेर नगरपालिका निवडणुकीतील झालेल्या निवडणुकांचे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीन सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी व शासकीय प्रतिनिधी यांच्या साक्षीने बंद करण्यात आले आणि त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले.
आज हे सीसीटीव्ही कॅमेरे एक तास बंद झाल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे तातडीने संगमनेर सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये विश्वासराव मुर्तडक, किशोर पवार, महेश खटाटे, प्रवीण अभंग, अमित गुंजाळ, सौरभ कासार, सचिन सातपुते, लाला खान पठाण, नूर मोहम्मद शेख, अमजद पठाण, सागर कानकाटे, संदीप लोहे यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी क्रीडा संकुलाच्या बाहेर बसून प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, तासभर सीसीटीव्ही कॅमेरे बंद का होते? याचे समाधानकारक उत्तर मात्र मिळू शकले नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यानंतर प्रशासनाचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले.
कॅमेऱ्यांची संख्या वाढविली – अरुण उंडे
निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोणताही इशू झालेला नाही. दोघा तिघांनी याबाबत संभ्रम निर्माण केला होता. सदर प्रक्रियेबाबत तीन तारखेपर्यंत नियोजन केले होते. कमी कॅमेरे होते, आता कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. मेमरी भरल्यानंतर नवीन हार्डडिस्क टाकण्यात आली. सदर प्रक्रिया इन कॅमेरा करण्यात आली.
सत्ताधारी काहीही करू शकतात – मुर्तडक
देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी ईव्हीएमच्या जोरावर निवडणूक जिंकत आहे. त्यातच संगमनेरमध्ये एक तास सीसीटीव्ही कॅमेरे बंद हा काय प्रकार आहे हे प्रशासनाने सांगितले पाहिजे. काही वेगळे करण्याचा दबाव तर प्रशासनावर नव्हता ना, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे, असे माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी म्हटले आहे.




























































