
दुचाकीवरून घरी जाणाऱ्या बहीण-भावावर घराजवळच असलेल्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात घडली आहे. या दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गंभीर जखमी असलेल्या मुलीला उपचारासाठी नाशिकला पाठविण्यात आले आहे.
प्रवीण नरोडे आणि पूजा नरोडे (रा. नरोडे मळा, कोल्हेवाडी, ता. संगमनेर) अशी जखमी भावंडांची नावे आहेत. प्रवीण आणि पूजा हे दोघे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता संगमनेर येथून दुचाकीवरून घरी परतत होते. घराच्या जवळ आले असता, उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने अचानक त्यांच्यावर झेप घेतली. यामुळे दोघे गाडीवरून खाली पडले.
बिबटय़ा त्यांच्या अंगावर धावून गेला असता, दोघांनीही आरडाओरडा केल्याने बिबटय़ा पळून उसात लपला; परंतु त्याने पुन्हा दोघांवर हल्ला करून पूजाच्या पायाला चावा घेतला. प्रवीणला बिबटय़ाची नखे लागल्याने तो जखमी झाला आहे. दोघांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र, पूजा गंभीर जखमी असल्याने तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेण्यात आले आहे.
बिबटय़ाने हल्ला केल्याची माहिती मिळताच, संगमनेर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिबटय़ा या परिसरामध्ये अजूनही लपून बसला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन नंदू दिघे, उपसरपंच संजय कोल्हे, माजी सरपंच जालिंदर दिघे, मोहन वामन, अमोल कोल्हे व ग्रामस्थांनी केली आहे.



























































