शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शहरातील विद्यानगर, देवाचा मळा आणि पंपिंग स्टेशन परिसरातील तीन ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. दरम्यान, शहरात मास्क न घालता ग्राहक दिसल्याने तीन दुकाने सील करण्याची कारवाईही करण्यात आली.
नगर जिह्यात कोविडचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. त्यातही जिह्यातील नगर शहर, राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर व राहाता तालुक्यांत झपाटय़ाने रुग्णवाढ होत असल्याने येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व अधिकाऱयांना आवश्यक सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी भोसले बैठका घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी नगरपालिकेच्या रामकृष्ण सभागृहात अधिकाऱयांसमवेत संगमनेर तालुक्यातील कोविडस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. सुरेश शिंदे, तहसीलदार अमोल निकम, वैद्यकीय अधीक्षक राजकुमार जऱहाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरिया, डॉ. सीमा घोगरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, तालुका निरीक्षक पांडुरंग पवार, घारगावचे निरीक्षक सुनील पाटील, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी पोलिसांना सक्तीने कारवाई करण्याचे आदेश दिली. कोणतीही हयगय न करता मास्कशिवाय फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. कोविडचा प्रादुर्भाव वाढलेला असतानाही विवाहसमारंभांना मोठी गर्दी होत आहे तसेच अनेक दुकानांमध्ये कोविडच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले. मास्कशिवाय दुकानदार अथवा ग्राहक आढळल्यास तसेच मंगलकार्यालयांमध्येही मास्कशिवाय कोणी दिसल्यास अशी ठिकाणी महिनाभर सील करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, ग्राहकांनी मास्क न घातल्याने बसस्थानकाजवळील चंदुकाका सराफ, नवीन नगर रस्त्यावरील प्रवरा मेडिकलसह जाणता राजा मार्गावरील हॉटेल राजबक्षी सील करण्यात आले.
कोविड आरोग्य केंद्र पुन्हा सुरू होणार
जिह्यातील कोविडचा आलेख वाढलेला असला तरीही लॉकडाऊनसारखा निर्णय होणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नियमांची सक्तीने अंमलबजावणी आणि त्याचे पालन हाच त्यावरील उपाय आहे. यावेळी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात कोविड आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करणार असल्याचे व तेथे आवश्यक औषधांचा पुरवठा करणार असल्याचेही जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
































































