
पारदर्शी कारभारासह, शाखा विस्तार आणि चांगल्या कामाचा ढोल बडविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात आलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत अपर आयुक्तांनी जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यात प्रामुख्याने नोकरभरती, फर्निचर व मालमत्ता खरेदी, बोगस कर्जवाटप, संगणक खरेदी, जयवंत कडू-पाटील यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती, 70 कोटींची कर्जे राईट ऑफ करणे आदी अनेक प्रकरणांची गंभीर दखल घेतली आहे. सहकारी संस्था, कोल्हापूर विभागीय सहनिबंधकांना याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे जिह्याच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
सांगली जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी सहकार खात्याकडे 9 डिसेंबर 2020 रोजी तक्रार केली होती. त्यात प्रामुख्याने नोकरभरती, फर्निचर व मालमत्ता खरेदी, बोगस कर्जांचे वाटप, टेकल पदांची भरती, संगणक खरेदी आदी बाबींमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. बँकेच्या एनपीएचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढणे, फिट ऍण्ड क्रायटेरियानुसार अपात्र असलेले जयवंत कडू-पाटील यांची कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक करणे, 70 कोटी रुपयांची कर्जे राईट ऑफ करणे अशा तक्रारींची अपर आयुक्त व विशेष निबंधक डॉ. पी. एल. खंडागळे यांनी गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
एनपीए 20 टक्क्यांवर गेल्याने वसुली ठप्प
जयवंत कडू-पाटील यांची नियुक्तीही बेकायदेशीर असून, काही विशिष्ट संचालकांना मदत व्हावी, यासाठी कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. संचालक मंडळाच्या सभेत सुमारे 70 कोटी रुपयांची कर्जे राईट ऑफ करण्यात आली. नोकरभरतीमध्येही मोठा घोटाळा झाला असून, एनपीएची रक्कम मोठी असल्याने वसुली ठप्प झाली आहे. एनपीएचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
दीड वर्ष उलटूनही सॉफ्टवेअरचे काम सुरू नाही
जिल्हा बँकेकडून 800 सोसायटय़ांना संगणक सॉफ्टवेअरचे टेंडर काढण्यात आले. यात एवढय़ा किचकट अटी घालण्यात आल्या की त्यात दुसऱ्या कोणत्याही कंपनीला टेंडर भरता येणार नाही. हेही काम एका विशिष्ट कंपनीला देण्यात आले. दीड वर्षापूर्वी हे काम देण्यात आले. पण, अजूनही सॉफ्टवेअरचे काम सुरू नाही. मार्च 2021 पर्यंत सोसायटय़ांचे कामकाज ऑनलाइन करण्यास सांगितले आहे. विशिष्ट कंपनीचे संगणक घेण्याचा अट्टाहास केला जात आहे. या सर्व प्रकरणाबाबत फराटे यांनी केलेल्या तक्रारीस अनुसरून अपर आयुक्तांनी जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश डॉ. खंडागळे यांनी दिले आहेत.




























































