
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढू लागल्याने आरोग्य सुविधांची वानवा निर्माण झाली आहे. ऑक्सिजन, बेड, रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा भासू लागला आहे. त्यामुळे आज (बुधवार) पासून कोल्हापूर जिल्ह्यात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू तर सांगली जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यांसह नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातही जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता आजपासून पुढील 10 दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या त्याप्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिविरच्या भासणाऱया कमतरतेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ तसेच पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यात झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदींसह अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली असून, रुग्णसंख्या आणखी वाढल्यास ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. या वाढत्या रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी उद्यापासून जिह्यात जनता कर्फ्यू करावा अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. रुग्णसंख्या थांबविण्यासाठी जनता कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांनी त्याची अंमलबजावणी करावी अशी सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली, तसेच आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी लसीकरणासाठी येणाऱया नागरिकांना सूट देऊन लॉकडाऊन कडकडीत करावा अशा सूचना केल्या.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला नाही. कोल्हापूर जिह्यात 2 हजार 400 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिह्यातून पुरवला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
पाथर्डीत दहा दिवसांचा जनता कर्फ्यू
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे येत्या 6 मे ते 16 मेपर्यंत संपूर्ण तालुक्यात जनता कर्फ्यू जाहीर करण्याचा निर्णय आज झालेल्या प्रशासकीय बैठकीत घेण्यात आला. आज तहसील कार्यालयात या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी देवदत्त केकाण हे होते, तर यावेळी तहसीलदार श्याम वाडकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नायब तहसीलदार पंकज नेवसे, गटविकास अधिकारी शीतल खिंडी, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळी, डॉ. जगदीश पालवे, नगरसेवक महेश बोरुडे, डॉ. रमेश हंडाळ हे उपस्थित होते.
जीवनावश्यक वस्तूंपेक्षा जीवन महत्त्वाचे – जयंत पाटील
सांगली जिल्ह्यात आज तब्बल 1575 रुग्ण आढळले असून, 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यात 5 मे रोजीच्या मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगली जिह्याला ऑक्सिजन काठावर मिळतोय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावा लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे सद्यस्थितीत गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळेच संपूर्ण जिह्यातील नागरिकांनी हा संपूर्ण लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी जिल्हावासीयांना केले आहे.




























































