
कंत्राटी वीज कामगाराला बेदम मारहाण केल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सांगली जिल्ह्यातील ढालगाव येथे घडली. रमेश दगडे (वय 41 )असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचं नाव आहे, वीज चोरी रोखण्याचा प्रयत्न केल्याने या कामगाराला बेदम मारहाण करून ठार मारल्याचा आरोप कंत्राटी कर्मचारी युनियनने केला आहे. सांगली जिल्ह्यतल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव सेक्शन मध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याला दोघांकडून बेदम मारहाण झाली.या कर्मचाऱ्याला उपचारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
ढालगाव परिसरातील एक ट्रान्सफॉर्मर जळाला होता त्याच्या दुरुस्तीसाठी हा कर्मचारी तिथे गेला होता. तिथे त्याला आकडे टाकून वीज चोरी होत असल्याचे दिसून आलं त्याने ही वीजचोरी रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन जणांनी त्याला बेदम मारहाण केली असा आरोप कर्मचारी संघटनेने केला आहे. याप्रकरणी कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे परंतु संबंधित दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना महावितरण’ने आर्थिक मदत करावी अशी मागणी कंत्राटी कर्मचारी संघटनेने केली आहे.























































