
काही दिवसांपासून लक्ष लागून राहिलेली सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक आज जाहीर झाली. बँकेच्या निवडणुकीची आचारसंहिता व अर्ज भरण्यास उद्यापासून (दि. 14) प्रारंभ होणार आहे. 22 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. दिवाळीनंतर 21 नोव्हेंबरला मतदान, तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी जाहीर केला. त्यामुळे ऐन दिवाळीत निवडणुकीचा धुमधडाका सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील आणि काँग्रेसचे सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक महत्त्वाची ठरणारी आहे. त्यामुळे दोघांच्या निर्णयाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर होणार? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे आणि नेतेमंडळींचे लक्ष लागले होते. तशातच मतदार यादीबाबत अन्य जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील संस्थांनी याचिका दाखल केल्यामुळे त्याचा परिणाम होणार काय? याबाबतही तर्कवितर्क लढवले जात होते, परंतु जिह्यातील कोणत्याही संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली नसल्यामुळे निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला. सहकारी संस्था नियम 2014 चे नियम 18 प्रमाणे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणच्या मान्यतेने निवडणूक निर्णय अधिकारी करे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. बँकेच्या 21 जणांच्या संचालक मंडळासाठी ही पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज दाखल करणे – 14 ते 22 ऑक्टोबर
- दाखल उमेदवारांची यादी प्रसिद्ध – 22 ऑक्टोबर
- उमेदवारी अर्जांची छाननी – 25 ऑक्टोबर n वैध उमेदवारांची यादी – 26 ऑक्टोबर
- अर्ज माघारी घेणे – 26 ऑक्टो. ते 9 नोव्हेंबर
- उमेदवार अंतिम यादी – 10 नोव्हेंबर
- मतदान – 21 नोव्हेंबर n मतमोजणी – 23 नोव्हेंबर.



























































