
सांगली कार्यालयात असूनही जिल्हाधिकारी शुक्रवारी कुणालाच भेटत नाहीत. तसा फलकच त्यांच्या कार्यालयाबाहेर आहे. शिवाय अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारीही आज गायब. त्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हाधिकारी कार्यालयच ओस पडल्याने कोणी उपजिल्हाधिकारी, तहसीलदारही दिसेना. त्यामुळे आपली कैफियत घेऊन भेटायचे कुणाला? असा सवाल शुक्रवारी सांगलीत आलेल्या जनतेला पडला होता. अधिकाऱयांनी दांडी मारली की, त्यांनी हक्काच्या रजा घेतल्या? एकाच दिवशी सर्व अधिकारी अचानक गेले कुठे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
शुक्रवारचा दिवस म्हणजे आठवडय़ातील कामकाजाचा शेवटचा दिवस. पुढचे दोन दिवस आणि सोमवारी उशिरा येणारे अधिकारी यामुळे लोक गुरुवार, शुक्रवारी आपली कामे घेऊन जिल्हा प्रशासनाच्या दारात येतात. मात्र, जिल्हाधिकारी राजा दयानिधी हे शुक्रवारी कुणालाच भेटत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कचेरीचे सगळेच कर्मचारी निवांत झालेले असतात. शुक्रवारी दुपारी अपर तथा प्रभारी जिल्हाधिकारी उपस्थित नव्हत्या. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यालयाबाहेर आजचा दिवस 11 ते 1 जनतेला भेटण्यासाठी राखीव होता. त्यामुळे नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकाऱयांचे कार्यालय गाठले. तिथे कर्मचारी सोडले, तर कोणीही नव्हते. इतके प्रमुख अधिकारी नसतील, तर महसूल उपजिल्हाधिकाऱयांकडे लोकांनी भेटावे, अशी पूर्वीपासूनची प्रथा आहे. विशेष म्हणजे आज तेही हजर नव्हते. त्यामुळे लोकांना आल्या पावली माघारी फिरण्याशिवाय पर्याय नव्हता.
सर्वत्र रिकाम्या खुर्च्यांचेच दर्शन
कार्यालयांमध्ये अधिकारी उपस्थित नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर पत्रकारांनी सहज संपूर्ण जिल्हाधिकारी कचेरीत फेरफटका मारला, तेव्हा बहुतांश उपजिल्हाधिकारी आणि अनेक तहसीलदार दर्जाचे अधिकारीसुद्धा आपल्या खुर्चीवर नसल्याचे दिसून आले. संपूर्ण कार्यालय फिरून काढले, तेव्हा पुरवठा शाखेचे तहसीलदार बारकुल यांच्याकडे संपूर्ण जिल्हाधिकारी कचेरीचा पदभार असावा, असे वातावरण होते. बारकुल यांना आपल्या खात्यातील लोकांची गर्दी सांभाळण्याचे आधीच टार्गेट असते. त्यात इतर जनतेलाही त्यांना भेटण्याशिवाय पर्याय नव्हता.
मुख्यमंत्र्यांचे कार्यालय असूनही अधिकारी गायब
शासनाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर गर्दी होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांचे कार्यालय प्रत्येक जिह्यात सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकाऱयांकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून त्या कचेरीचा पदभार आहे. मात्र, या कार्यालयातही कोणीही उपस्थित नव्हते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय ओस पडल्याची चर्चा सुरू होताच, जिल्हाधिकारी शुक्रवारी कुणालाच भेटत नाहीत. तसा फलकच त्यांच्या कार्यालयाबाहेर असल्याचा खुलासा जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आला.

























































