पूरग्रस्त भागांतील कामाची ‘बक्षिसी’ मिळाली, मात्र शेकडो सफाई कर्मचारी पगारासाठी वेटिंगवरच

417

ऑक्टोबर महिन्याची 10 तारीख उलटली तरी ‘डी’ विभागातील शेकडो सफाई कामगारांना बायोमेट्रिक हजेरीच्या घोळात रोखलेला पगार अद्याप मिळालेला नाही. विशेष म्हणजे सांगली-कोल्हापूर पूरग्रस्त भागांत काम केलेल्या कर्मचारी-अधिकाऱयांना जाहीर केलेली वाढीव पगाराची ‘बक्षिसी’ नुकतीच खात्यावर जमा झाली असली तरी हक्काच्या पगारासाठी कामगार वेटिंगवरच आहेत. याबाबत पालिका प्रशासनासोबत उद्या शुक्रवारी होणाऱया बैठकीत निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बायोमेट्रिक हजेरी पगाराला लिंक केल्यामुळे पालिका कर्मचाऱयांचे पगार वेळेवर न होण्याचा गोंधळ सुरू आहे. कर्मचाऱयांची प्रशासनाच्या या अन्यायकारक कारभाराबाबत विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलनही करण्यात आले. मात्र अजूनही शेकडो सफाई कामगारांचा पगार अद्याप झाला नसल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे संघटक प्रवीण मांजलकर यांनी दिली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पगार रोखण्याचा प्रकार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीने आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पालिका आयुक्तांनी ऑगस्टमध्ये समन्वय समितीसोबत झालेल्या बैठकीत नोव्हेंबरपर्यंत बायोमेट्रिक हजेरीतील त्रुटी दूर करू आणि तोपर्यंत कुणाचाही पगार रोखणार नाही असे आश्वासन दिले होते, मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही पगार रोखल्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी कर्मचारी वर्गातून केली जात आहे.

सहाशेहून जास्त कर्मचारी हवालदिल

बायोमेट्रिक हजेरी पगाराला लिंक केल्यामुळे पालिका प्रशासनाकडून पगार रोखण्याचे प्रकार सुरूच असून ‘डी’ विभागातील कर्मचाऱयांना महिनाभर काम करूनही फक्त 290 रुपयांपासून 500, 1000-4500 रुपयांपर्यंत पगार आल्याचे समोर आले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत हा प्रकार घडल्याने सुमारे 600 हून जास्त सफाई कामगार हवालदिल झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून असा प्रकार सुरू असल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या