सांगली मनपाचा घनकचरा प्रकल्प ठेकेदारासाठी ठरतोय सोन्याची खाण! विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका क्षेत्रातून दररोज जमा होणाऱया कचऱयावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून सुमारे दीड लाख रुपये रोज खर्च केला जात असताना दुसरीकडे ठेकेदार कंपनी मात्र कचऱयातून मोठय़ा प्रमाणात आर्थिक लाभ मिळवत आहे. घनकचरा प्रकल्प हा ‘महापालिकेसाठी तोटय़ाचा, तर ठेकेदारासाठी सोन्याची खाण’ ठरत असल्याचा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत केला.

समडोळी रोड व बेडग रोड येथील कचरा डेपोवर दररोज जमा होणाऱया कचऱयावर प्रक्रिया केली जाते. या कामासाठी महापालिकेडून ठेकेदाराला प्रतिटन 700 रुपये दिले जातात. मात्र, याच कचऱयातून ठेकेदार कंपनी मोठय़ा प्रमाणात उत्पन्न मिळवत आहे. ओल्या व सुक्या कचऱयापासून कंपोस्ट खत तयार करून दररोज सुमारे 40 टन खतविक्री केली जाते. हे खत प्रतिटन सुमारे अडीच हजार रुपये दराने विकले जात असल्याने कंपनीला मोठा महसूल मिळत आहे. याशिवाय कचऱयातील प्लॅस्टिक व भंगार साहित्याच्या विक्रीतूनही कंपनीला अतिरिक्त उत्पन्न मिळते. इकडे महापालिका प्रक्रिया खर्च उचलत असताना दुसरीकडे ठेकेदाराला बहुआयामी नफा होत असल्याने या करारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे चव्हाण म्हणाले.

समडोळी रोड येथील घनकचरा प्रकल्पात 10 टन प्रतिदिन क्षमतेचा बायोमिथोनायजेशन प्रकल्प उभारला आहे. यातून निर्माण होणाऱया गॅसद्वारे वीजनिर्मिती करून ती पथदिवे, पंपिंग युनिटसाठी वापरायची योजना आहे. मात्र, प्रत्यक्षात ओला व सुका कचऱयाचे योग्य विलगीकरण होत नसल्याने या प्रकल्पाला पुरेसा ओला कचरा मिळत नाही. परिणामी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. त्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे. समुद्र कंपनीच्या करारासारखीच घनकचरा प्रकल्प करारात मोठी चालबाजी झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.