
सांगली-माधवनगर रस्त्यावरील चिंतामणनगर येथील रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी जुना बुधगावरोड व संजयनगरमार्गे वाहतूक सुरू केली आहे. मात्र, जुना बुधगाव रोडवर जड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. जड वाहनांमुळे हा मार्ग अडचणीचा बनला आहे.
कॉलेज कॉर्नर ते माधवनगर दरम्यानच्या चिंतामणनगर येथील रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाचे काम शनिवारी रात्रीपासून हाती घेण्यात आले आहे. किमान सहा महिने या कामासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे हा पूल 10 जानेवारी 2024 पर्यंत बंद राहणार आहे. या मार्गावरून वाहतूक बंद असल्याने पर्यायी संजयनगर व जुना बुधगाव रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. सांगलीहून माधवनगरमार्गे तासगावला जाण्यासाठी बायपास रोड, जुना बुधगावरोड, समाजकल्याण कार्यालय, पंचशीलनगरमार्गे जाता येणार आहे. मात्र, या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ लागली आहे. अवजड वाहतुकीसाठी हा एकमेव मार्ग आहे.
संजयनगर येथून शिंदेमळा पुलाखाली अवजड वाहतूक करता येत नाही. त्यामुळे जुना बुधगाव रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण पडत आहे. येथील जुना बुधगाव रेल्वे गेटजवळ दोन्ही बाजूने वाहने जात नाहीत. एकेरी वाहतूकच करावी लागते. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूककेंडी निर्माण झाली होती. रेल्वे गेट लागल्यावर माधवनगरच्या बाजूला पंचशीलनगरपर्यंत वाहनांची रांग लागलेली होती. तर सांगलीकडेच्या बाजूला समाजकल्याण कार्यालयापर्यंत वाहनांची रांग होती. तर या मार्गावरील खड्डय़ांचे पॅचवर्क प्रशासनाने केले आहे. मात्र, अरुंद रस्ता व बाजूच्या खड्डय़ांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे हा मार्ग अडचणीचा बनला आहे. दुसरीकडे संजयनगर, शिंदेमळा रेल्वे ब्रीज खालील शहरात दुचाकी व चारचाकी येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. संजयनगर सह्याद्रीनगर उड्डाणपुलावरून वाहतूक होणे गरजेचे आहे. मात्र, या मार्गाने वाहतुकीचा पल्ला चार ते पाच किलोमीटर लांब होत असल्याने वाहनधारक शिंदेमळ्याकडूनच येत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.




























































