
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग लवकरच वेगवान होईल असा दावा केला जात आहे. पण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा तालुक्यात महामार्गावरील अनेक पूल आणि चौपदरीकरणाचे काम काही प्रमाणात शिल्लक आहे. संगमेश्वर येथील सोनवी पूल आणि आजूबाजूच्या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. परंतु वाहतूक कोंडीने येथे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दररोज येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते . गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढतच चालले आहे. रुग्णवाहिकासुद्धा बराचवेळ अडकून पडत आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि ठेकेदार कंपनीचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी, परिस्थिती नियंत्रणात येण्यास वेळ लागत आहे.
प्रशासनाने येथील वाहतूक व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाहतुकीचा खोळंबा दूर करावा, अशी मागणी लोकांमधून होत आहे. स्थानिकांचा सवाल असा आहे की, काम सुरू असताना यंत्रसामग्रीची पूर्वतयारी नसेल तर कोंडी वाढतच जाणार. त्यामुळे प्रशासनाने समन्वय वाढवून वाहतूक व्यवस्थापन करावे अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे . दरम्यान संगमेश्वर सोनवीपूल ते पैसा फंड इंग्लिश स्कूल या दरम्यान रस्त्याला पडलेले मोठे खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत अशी मागणी वाहन चालक तसेच पादचाऱ्यांनी केली आहे. पैसा फंड इंग्लिश स्कूल जवळ सर्विस रोड न काढता काम सुरू केल्याने येथे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने नोंद घेणे आवश्यक आहे अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा पालक वर्गाने दिला आहे.


























































