क्रिकेटवारी – मिचेलच्या बॅटवर फुल्ली!

>> संजय कऱ्हाडे

फार वर्षांपूर्वी एकदा क्रिकेटच्या गप्पा सुरू होत्या. संदीप पाटीलला आठवण आली होती एका टाइम्स शिल्ड सामन्याची. टाटा विरुद्ध निरलॉन, हिंदू जिमखाना. निरलॉनच्या पहिल्या डावातल्या धावा पार करण्यासाठी थोडय़ाच धावा आवश्यक असताना टाटाचा फलंदाज बाद झाला अन् फलंदाजीला आला एक वेगवान कसोटी गोलंदाज. तेव्हा आणखी एक फलंदाज बाद करता आला तर निरलॉनसाठी सामना जिंकण्याची शक्यता वाढणार होती! ‘त्या कसोटी गोलंदाजाने गार्ड घेतल्यावर मी पुढे गेलो आणि त्याच्या बॅटवर ओम-राम-ऱिहम म्हणत फुली मारली. तो रागावला, मोठा फटका मारण्याच्या नादात पहिल्याच चेंडूवर बाद झाला!’ हास्यकल्लोळात संदीपचे डोळे मिश्कीलपणे चमकले होते!!

आज मला तोच मंत्र म्हणत मिचेलच्या बॅटवर फुली मारावीशी वाटतेय! तशीच फुली यंग, कॉन्वे, निकल्स, फिलिप्स आणि कप्तान ब्रेसवेलच्या बॅटवरही मारावीशी वाटतेय… गमतीचा भाग सोडा, पण पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिकेत बरोबरी दिसत असली तरी न्यूझीलंडच्या संघाने वर्चस्व गाजवलं हे मान्य करावंच लागेल. पहिल्या सामन्यात आपण जिंकलो, पण रडत-खडत. दुसऱयात मिचेल अन् यंगने पार सीमारेषेवर उभं केलं. आता सीमारेषेबाहेर फेकलं जाण्यापूर्वी सावरणं गरजेचंच! नवखा, डावरा लेनॉक्स आणि कप्तान ऑफस्पिनर ब्रेसवेल परिणामकारक दिसले! लेनॉक्सने तर आपल्या फलंदाजांच्या लेग स्टम्पचा ब्लाइंड स्पॉट शोधण्याचा प्रयत्न केला! पदार्पणाच्याच सामन्यात त्याने केलेला यत्न मला आवडला! कसोटी अन् वन डेत परदेशी फिरकीबाज सर्रास आपल्या फलंदाजांना जखडतायत, टप्प्यात पकडतायत पाहून हल्ली माझी लेखणी ऱहस्व-दीर्घ चुकतेय!

अर्थात, आपल्या आघाडीच्या फलंदाजांपैकी किमान दोघं आज तडफदार डावासून दूर नसावेत. शुभमनचा सूर लागलाय, रोहितने आपला ऑफ ड्राईव्ह बॅटची दिशा न बदलता सरळ बॅटने खेळला तर त्याला यश मिळू शकतं हे तो स्वतः मान्य करेल. शतकाजवळ पोहचल्यावर धावांची गती विराटने आणि त्याच्या साथीदारांनी कायम ठेवणं जरूरी आहे! नियमितपणे घेतलेल्या एकेरी-दुहेरी धावा जिंकण्यासाठी अनमोल! श्रेयस अन् राहुलकडूनही अपेक्षा आहेत.

मालिकेचा निकाल ठरवणाऱया सामन्याची महती मी काय सांगावी! हा सामना हिंदुस्थानी संघाचा आत्मविश्वास वाढवू शकतो. यापुढे होणाऱया पाच टी-ट्वेंटी सामन्यांची आणि पर्यायाने विश्वचषकाच्या दृष्टीने होणारी क्रमणा ठरवू शकतो! मोठय़ा सामन्यांत ‘रो-को’ने बऱयाचदा निकाली कामगिरी केलेली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-ट्वेटी चमूत श्रेयस, बिष्णोईचं स्वागत!

फलंदाजांप्रमाणेच जाडेजा, सिराज, हर्षितची जबाबदारी मोठी असेल. आजकाल जाडेजा काहीसा नाराज करतोय. त्याचा आर्मर किती कार्यरत आहे असाही मला प्रश्न पडतो. व्यवस्थापनाने प्रसिध अन् नितीशचा नाद सोडावा! प्रसिधऐवजी अर्शदीप आणि आयुष बदोनी संघात खेळण्याची शक्यता वाटतेय! नियमित संधीअभावी अर्शदीप होरपळून जाईल. तसंच मिचेलने फटकावलं म्हणून कुलदीपलाही टाळू नये एवढी विनंती. कुलदीप मिचेलला स्वीपच्या जाळय़ात पकडू शकतो…

जालं वीणपा की हो,

जालं उडोवपा की हो,

आस माका म्हावऱयाची लागली…