
>>संजय कुळकर्णी
परवा शिवाजी मंदिरला ‘यदा कदाचित रिटर्न्स’ हे संतोष पवारचे नाटक पाहण्यास गेलो. नाटकाचा प्रयोग सुरू झाला. संतोषच्या नाटकात जो त्याचा नाटकाचा फॉर्म असतो तोच रंगमंचावर सादर होत होता. तशाच प्रकारची गाणी आणि संगीत, नृत्य पाहून तर संतोषच्या करिअरच्या भूतकाळात गेलो. नाटक पाहताना त्या नाटकाबद्दल विचार घोळू लागले. संतोष पवार गॅप घेऊन ‘यदा कदाचित’चे पुन्हा नव्या कलाकारांना घेऊन सध्याच्या राजकीय घटनांवर टपल्या टिचक्या मारण्यासाठीच नाटक करतो की काय, अशी शंका क्षणभर आली. प्रयोग पाहण्यास एकाग्रता साधू शकत नव्हतो. मध्यंतर झाला आणि नाटय़गृहाबाहेर पडलो. संतोष पवारला एक पत्र लिहायचं या मन:स्थितीत होतो. म्हणूनच संतोष तुला प्रथमच पत्र लिहितोय.
संतोष, आज तू जी नाटकं करतो आहेस त्याचा प्रामाणिकपणे विचार केलेला आहेस का? तुझ्या आतापर्यंतच्या बहुतांशी सर्वच नाटकात तोच फॉर्म पाहण्यास मिळाला आणि मिळतोय. काही तुझी नाटकं वेगळी असतीलही. तरीही तू त्याच फॉर्ममध्ये जखडून गेला आहेस. तुझ्या आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतील सर्वच एकांकिका पाहिलेल्या आहेत. तुझ्या लेखनातील स्पार्क त्याच वेळी जाणवला होता. हा व्यावसायिक रंगभूमी निश्चितपणे गाजवणार आणि अधिराज्य करणार असं भाकीत त्यावेळी केलं होतं. तुला व्यावसायिक रंगभूमीवर जेव्हा ब्रेक मिळाला तेव्हा तुझ्या नव्या फॉर्मचं आम्ही कौतुक केलं. प्रेक्षकांनीसुद्धा तुझ्या नाटकांना चांगलाच प्रतिसाद दिला. व्यावसायिक रंगभूमीवरील काही निर्मात्यांना ते रुचत नव्हतं. तो व्यावसायिकतेची घडी विस्कटणार अशा प्रतिािढया ते देत होते. तू मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत होतास.
तुझ्या ‘यदा कदाचित’ या नावाने लिहिलेल्या नाटकाला आणि तुझ्या रंगभूमी कारकिर्दीला परिसस्पर्श व्हावा तसंच झालं. ‘यदा कदाचित’ हे नाटक रसिकांनी उचलून धरलं आणि प्रत्येक प्रयोगास हाऊस फुल्लचे बोर्ड लागले. निर्माते दत्ता घोसाळकर आणि सुरेश भोसले यांना त्याचं श्रेय द्यावं लागेल. कारण त्यांनी ‘यदा कदाचित’ नाटकाची निर्मिती केली होती. आज दत्ता घोसाळकर हयात नाहीत, पण त्यांची साथ तुला मिळाली नसती तर नाटक मागे पडलं असतं. या नाटकावर अनेक पारितोषिकांचा वर्षाव झाला. पाच हजार प्रयोग झाले. मराठी रंगभूमीवरील ते माईल स्टोन नाटक ठरलं. किशोर चौघुले, कमलाकर सातपुते, भरत सावले, समीर चौघुले या कलाकारांना नाटकामुळे नाव मिळालं. ‘नाय नो नेव्हर’ हे पालूपद विशेष गाजलं. कालांतराने प्रयोग बंद झाले. त्यानंतर ‘यदा कदाचित 2’मध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे यांनी भूमिका करून नाटकाची रंगत वाढवली. काही वर्षांनी दत्ता घोसाळकर यांनीच पुन्हा नव्यांना घेऊन ‘यदा कदाचित’ नाटकाची निर्मिती केली. तूही त्याच ऊर्जेने दिग्दर्शन करताना गडकरी रंगायतनच्या तालीम हॉलमध्ये तुला पाहिलंय. रंगभूमीच्या कठीण परिस्थितीत ‘यदा कदाचित’ नाटकाने रंगभूमीला तारलं हे सत्य आहे. ज्या निर्मात्यांनी तुझ्यावर टीका केलेली होती तेच तुला त्यांच्या संस्थेच्या नाटक दिग्दर्शनासाठी बोलावू लागले. संतोष त्याच वेळी तू जिंकला होतास. निर्मात्यांना तुझी गरज होती.
तुझी व्यावसायिक भरारी पाहताना तुझ्या नाटय़ जिद्दीला मी सलाम करीत होतो. तुझ्या नव्या नाटकांच्या जाहिराती आवर्जून पाहात होतो. त्यात दोन-दोन वर्षांनी ‘यदा कदाचित रिटर्न्स’ ही जाहिरात हटके असायची. मी त्या प्रयोगाला यायचो. नावीन्य शोधायचो. एकदा मी गप्पात बोललोसुद्धा ‘कशाला करतोस हे नाटक?’ त्यावेळी तू म्हणाला होतास, ‘सर नाटकाच्या मागे अनेक कलाकार, रंगमंच कामगार आहेत. त्यांच्या पोटापाण्यासाठी प्रयोग करावे लागतात.’ त्यातून तुझ्या भावना कळत होत्या. पण संतोष त्यासाठी ‘यदा कदाचित’ हे नाटक का करतोस? दरवेळी त्यात तू नवं असं काय करणार आहेस? नवा प्रयोग पाहताना जाणवलं रे. ‘यदा कदाचित’ पूर्वीचे आणि रिटर्न्स यात नवीन काहीच नाही रे. प्रेक्षकांना वाटतं की तेच पूर्वीचं नाटक आहे. प्रेक्षकांचा विश्वासघात करू नकोस रे. हे तुझे मायबाप प्रेक्षक आहेत. त्यांनी तुझ्या नाटकांवर प्रेम केलं आहे. उसाचा रस काढताना पहिल्या धारेच्या रसाला जेवढा गोडवा असतो तेवढा चार-पाच वेळा काढलेल्या उसाच्या चोथ्याच्या रसाला नसतो रे. तसं ‘यदा कदाचित’ नाटकाचं झालंय. ‘यदा कदाचित’ हे सहा अक्षराचं नाव जप रे. त्या नावाला एक इतिहास आहे. तो तूच लिहिला आहेस. या नाटकाची कोनशीला रंगभूमीवर तूच उभारली आहे. नव्या फॉर्मचं नवं नाटक लिही. तू लिहू शकतोस. तसं जमत नसेल तर रेस्ट घे. पण ‘यदा कदाचित’ नाटकाचा अंत मात्र करू नकोस. मित्रा तुझ्याबद्दल वाटतं म्हणून कळकळीने पत्र लिहिलं. तू त्याचा निश्चितपणे विचार करशील. अरे, खोटी स्तुती करणारे पुष्कळ आहेत त्यांच्या मोहजाळ्यात फसू नकोस इतकंच वाटतं रे.


























































