वाकोल्यातील राजेंद्र कांबळे रस्त्याचे काम मार्गी लावा, संजय पोतनीस यांची आग्रही मागणी

वाकोला सांताक्रुझ पूर्व येथील राजेंद्र कांबळे रस्त्याचे काम गेल्या तेरा वर्षांपासून रखडले आहे. हंस भुग्रा रोडपासून ग्रँड हयात हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधून राजेंद्र कांबळे रोडला जोडणाऱ्या प्रस्तावित विकास आराखडय़ाचे काम त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी शिवसेना संजय पोतनीस यांनी आज विधानसभेत केली

शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधले. माझ्या कलिना विधानसभा क्षेत्रातील वाकोला सांताक्रुझ (पू.) येथील कोलेकल्याण पोलीस पंपाऊंडपासून हंस भुग्रा रोडला जोडणाऱ्या राजेंद्र कांबळे रोडचे काम रखडले आहे. हा रोड विकास आराखडय़ामध्ये वगळलेला भाग (एक्सक्युडेड पार्ट) दाखवला असून सरकारने त्याला मंजुरीही दिली आहे. या विभागात वाहतूककोंडी निर्माण झाली असून त्यामुळे या रस्त्याचे काम युद्धपातळीवर हाती घेणे आवश्यक आहे. तसेच महापालिकेच्या विकास आराखडय़ात हंस भुग्रा रोडपासून ग्रँड हयात हॉटेलकडे जाणाऱया रस्त्याच्या मधून राजेंद्र कांबळे रोडला जोडणाऱया  रोडला 12.20 मीटर रुंद असलेला रस्ता दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे दोन्ही विकास आराखडय़ात रोडचे काम झाल्यास वाहतूक कोंडी फुटेल आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल असे ते म्हणाले.

विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात मी या रस्त्याचा प्रश्न मांडला, पण त्यावर काही कार्यवाही झाली नाही. हे काम पूर्ण झाले तर दोन किमीचा वळसा वाचेल. फक्त पोलीस हद्दीतील पन्नास मीटरमुळे हा रस्ता अडकला आहे, याकडे संजय पोतनीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.