
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईचा कसोटीपटू पृथ्वी शॉ याला डोपिंग प्रकरणात बीसीसीआयकडून आठ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय येथेच संपुष्टात आला आहे. तरीही काही मीडियामधून सातत्याने तोच विषय चिघळला जातोय. यामधून वेगळे काही करण्याची योजना तर नाही ना, असा सूर उमटू लागला आहे. मात्र पृथ्वी शॉ अजून लहान आहे. आता कुठे त्याच्या क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात झालीय. अशा गोष्टींमुळे त्याच्या करीअरवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पृथ्वी शॉची कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा घाट यशस्वी होऊ देणार नाही, अशा परखड शब्दांत शिवसेनेचे विभागप्रमुख- आमदार संजय पोतनीस यांनी काही विशिष्ट मीडियावर टीका केली.
वैयक्तिक आयुष्यावर लिहिणे योग्य नव्हे
खेळाडूशी किंवा त्याच्या वडिलांशी न बोलता त्या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यावर लिहिणे योग्य नव्हे. कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता वर्तमानपत्रात बातमी छापणे ही एकदम चुकीचीच बाब आहे, असे संजय पोतनीस यावेळी स्पष्टपणे म्हणाले.
डोपिंग वगळता इतर कोणत्याही विषयावर बोला
पृथ्वी शॉ लहान असल्यामुळे पत्रकारांना मुलाखती देणे त्याला शक्य होत नाही. यामुळे तर हा राग काढला नसेल ना, असाही प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. मात्र पृथ्वी शॉ हा हिंदुस्थानचे भविष्य आहे. त्याला शांतचित्ताने खेळू द्या. डोपिंग वगळता इतर कोणत्याही विषयावर त्याच्याशी बोला, मात्र आता हे सर्व थांबवा. पृथ्वीसाठी अशी मी विनंती करतो, असे संजय पोतनीस यावेळी आवर्जून म्हणाले.
यामुळे त्याचा आत्मविश्वास खालावेल
पृथ्वी शॉने उत्तेजक घेतले की नाही यावर चर्चा कशाला हवीय. विनाकारण तोच विषय पुनः पुन्हा काढल्यामुळे त्याच्या आत्मविश्वासावर फरक पडेल. याचा मागे कोणीतरी असल्याचा संशय आहे. योग्य वेळ येईल तेव्हा उत्तर देईन, असे संजय पोतनीस पुढे म्हणाले.




























































