राज्यसभेबाबत तीन पक्ष एकत्र बसून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील, संजय राऊत यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिल रोजी संपत आहे. महाविकास आघाडीकडे एका जागेसाठी आवश्यक संख्याबळ असून महाराष्ट्राच्या हितासाठी, अस्मितेसाठी काम करणारे नेतृत्व कोणते आहे, हे तीन पक्ष बसून ठरवतील. याबाबतचा निर्णय एकमताने होणार आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत शुक्रवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, राज्यसभेबाबत तीन पक्षांना मिळून निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकाही आहेत. त्याच्यावरही निर्णय घ्यावा लागेल. प्रत्येक पक्षाला वाटते की आम्ही महाविकास आघाडीचे महत्त्वाचे घटक आहोत. त्यामुळे आम्हाला संधी मिळावी हे प्रत्येकाला वाटणे साहजिक आहे. राजकारणामध्ये सुरुवातीला अशी झटापट होते. शेवटी आम्ही एकत्र बसून एकमताने निर्णय घेऊ.

काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांचा निर्णय मुंबई किंवा महाराष्ट्रात होतात. आम्ही एकत्र बसू आणि महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊ. मराठी भाषिकांनी संसदेमध्ये जाऊन महाराष्ट्राचे प्रश्न मांडावे यासाठी आम्ही सगळे तिथे जातो. त्यामुळे त्याच गुणवत्तेवरती कुणी तिथे जाऊन प्रतिनिधित्व करायचे हे तीन पक्ष एकत्र बसून ठरवतील.

ते पुढे म्हणाले की, विधान परिषद कुणी लढवायची, राज्यसभा कुणी लढवायची या संदर्भात निर्णय एकत्र बसून घेतला जाईल. शरद पवारांची राज्यसभा लढण्याची इच्छा आहे. त्यांची संसदीय कार्याची परंपरा फार मोठी आहे. अशावेळेला त्यांचा पक्ष किंवा ते स्वत: उघडपणे काय भूमिका घेतात त्याच्यावर बऱ्याच गोष्टींचे निर्णय होतील. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे सर्वात जास्त 20 संख्याबळ आहे, त्यानंतर काँग्रेसकडे 16 आणि शरद पवारांकडे 10 चे संख्याबळ आहे. महाविकास आघाडी आणि इतर घटकपक्ष मिळून आम्ही 50 पर्यंत जात आहोत. जिंकण्यासाठी 37 मतांची गरज आहे. म्हणजे आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे.

राज्यातील सात खासदारांची मुदत एप्रिलमध्ये संपणार, महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता!

यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरही भाष्य केले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, अस्मितेचे शत्रू आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहांच्या मदतीने चोरली म्हणून ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे प्रमुख होऊ शकत नाही. हा खटला कोर्टात आहे आणि तो आम्ही जिंकू. एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे आमचे भांडण आहे आणि राहील. ते भांडण व्यक्तिगत नसून ते महाराष्ट्राच्या हिताचे, स्वाभिमानाचे, नैतिकतेचे आहे. हे भांडण आम्ही टोकाला नेऊ, असे राऊत म्हणाले.