Sanjay Raut News – कुबड्यांवरचं भाजपचं सरकार कधीही कोसळू शकतं, संजय राऊत यांचा घणाघात

>> राजेश देशमाने, अकोला

भाजपला यावेळी बहुमत मिळालेलं नाही, हे सरकार कुबड्यांवरचं सरकार आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच हे कुबड्यांवरचं सरकार कधीही कोसळू शकतं असेही राऊत म्हणाले.

अकोल्यात आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा राऊत म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत बदल होईल अशी राज्यात परिस्थिती आहे. सरकारी तिजोरीतून पैश्यांची किती उधळपट्टी केली, लाडक्या बहिणीला पैसे मिळालेच पाहिजेत. पण पंधराशे रुपयांचा जो आकडा आहे, त्यात आमचं सरकार आल्यावर भरघोस वाढ होईल. लोकसभा निवडणूक हरल्यावर लाडक्या बहिणीची आठवण आली. तोपर्यंत फक्त फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार यांच्या पलीकडे यांचं लाडकं कोणी नव्हतं. एका एका आमदाराला 50 कोटी रुपये देण्यात आले, खासदारांना 100 कोटी रुपये देण्यात आले. आताही शिवसेनेच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना त्यांना फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये दिले जात आहेत. पण लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये. यावर प्रचारात चर्चा होईलच असेही राऊत म्हणाले

आमदार नितीन देशमुख यांना त्रास

आमचे आमदार नितीन देशमुख यांना त्रास दिला जात आहे. कारण ते मोदी शहा यांच्या तुरुंगाचे दरवाजे फोडून आले. त्यांनी बेईमानी केली नाही, ते सूरतमधून पळून आले आणि ते 50 खोक्यांना विकले गेले नाहीत. शेवटी चार्टर प्लॅनने इथे पाठवण्यात आलं. निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तसा त्यंना त्रास दिला जात आहे.

मोदी आणि शहांकडून सावत्रपणाची वागणूक

महाराष्ट्रात आमचे कुणीही सावत्र नाही. जे कुणी सावत्र आहेत ते दिल्लीमध्ये आहे. ते मोदी आणि शहा आहेत. ते महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देत आहेत. महाराष्ट्राचा ते भाऊच नाहीत. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे, तेवढं 100 वर्षात कुणी केलेलं नसेल. मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत. इतका लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारातला महाराष्ट्रात, देशात नाही पाहिला. यापूर्वी दिल्लीपुढे झुकणारे इतके मुख्यमंत्री पाहिले पण इतका लोचट मुख्यमंत्री आम्ही इतिहासात पाहिले नाही. हे जे बोलत आहेत ते दिल्लीचे पोपट म्हणू बोलत आहेत. ज्या दिवशी यांची सत्ता जाईल त्या दिवळी दिल्ली त्यांना पायाशी उभ करत नाही. महाराष्ट्राला बदल हवाय, आणि हे घटनाबाह्य सरकार घालवण्यासाठी आम्ही कंबर कसली आहे.

दोन नेते हस्तकांच काम करतात

एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. यावर राऊत म्हणाले की प्रकाश आंबेडक हे आंबेडकर आहेत. या देशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत, प्रकाश आंबेडकरांना त्याचं भान असतं तर त्यांनी अशा प्रकारची विधानं केली नसती. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई. हे खरे आंबेडकरांचे खरे वारसदार आहेत असे जर आमही म्हणालो तर त्यात चुकीचे काहीच नाहृी. गेली अनेक वर्ष रामदास आठवले आंबेडकरांचा विचार जिद्दीने पुढे नेत आहेत. अनेक वर्ष सत्तेत आहेत. डॉ. बाबासाहेब ज्या पद्धतीने देशात काम करायचे त्याच पद्धतीने आठवले करत आहेत. याचा अर्थ आम्ही असा म्हणायचा की आंबेडकरांची जी विचारधारा, संघटना होती त्याचे खरे वारसदार आठवले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावर अनंत उपकार केले आहेत. प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर येण्याचा प्रयत्न करत होते, ते महाविकास आघाडीचे घटक होते, लोकसभेत त्यांना आम्ही सात जागा देऊ केल्या होत्या. तरीही ते त्यांच्या बाजूला वळले तो काही बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भुमिका नाही. आपल्या कृतीमुळे राष्ट्रद्रोही आणि धर्मांध शक्तींना मदत होत असेल तर ते कुणीही असतील. महाराष्ट्रात असे दोन व्यक्ती आहेत ते हस्तकांचं काम करतात. कधी मोदी शहांना पाठिंबा देतात, कधी बेईमना शिंदे गटाला पाठिंबा देतात. हे दोन नेते आहेत महाराष्ट्रातले, त्यांच्यावर महाराष्ट्राने विचार करण्याची वेळ आलेली आहे. लोकसभा निवडणुकीत यांचं कोणी ऐकलं नाही. पाडापाडी करणे आणि व्यवहार करणे हे या नेत्यांचं काम आहे. खरं तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रद्रोही, धर्मांध शक्तींना धडा शिकवायला पाहिजे. पण तसे न करता या लोकांनी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आपले उमेदवार उभे केले पाहिजे म्हणजे त्यांना जास्त पैसे मिळतील. महाराष्ट्रात त्यांना कमी पैसे मिळतात, देशात त्यांनी निवडणुका लढवाव्यात आणि मोठा व्यवहार करावा. हे नेते कोण आहेत ते राज्याच्या जनतेला माहिती आहे.

पंतप्रधानांच्या डिग्रीचा वाद

या देशात पंतप्रधनांपासून भाजपच्या अनेक नेत्यांच्या डिग्र्या बोगस आहेत. महाराष्ट्रात बोगस डिग्र्या छापल्या जात आहेत. पंतप्रधानांच्या डिग्रीचाच जिथे वाद आहे, तिथे हा विषय फार गंभीर आहे.

कुबड्यांवरचं सरकार

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच बहुमत आलेलं नाही, हे आमचं सगळ्यात मोठं यश आहे. दोन्ही निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं. त्यांचं सरकार तीनशेच्या पार जाऊन स्वतःच्या ताकदीवर आलं होतं. यावेळी त्यांच्याकडे बहुमत नाही. हे कुबड्यांवरच सरकार आहे, या कुबड्या कधीही पडू शकतात.