मिंधे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी लावा, संजय राऊत यांची फडणवीसांकडे मागणी

मिंधे गटातील त्या पाच मंत्र्यांची नावं मी दिली आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी लावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

रविवारी पत्रकार परिषदेत बोलत असताना संजय शिरसाट यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला, त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, तो व्हिडीओ खरा आहे की मॉर्फ केलाय ते फॉरेन्सिक लॅब ठरवेल, तो व्हिडीओ काय आम्ही काढलाय का? माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी आहे की शिंदे गटाचे जे भ्रष्ट मंत्री आहेत त्यांची चौकशी करा. संजय राठोड यांच्यावर भाजप नेते परिणय फुके यांनी आरोप केले आहेत. संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरने दीडशे कोटीची जमीन घेतली. संजय शिरसाट यांची एकत्रित चौकशी केली पाहिजे. जशा क्लस्टरच्या नावाखाली मोठ्या इमारती बांधल्या जातात तशाच यांची एकत्र क्लस्टर चौकशी झाली पाहिजे. उदय सामंत यांच्यासहीत पाच मंत्र्यांची मी नावं दिली आहेत त्यांची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

”उद्धव ठाकरे आज जर मुख्यमंत्री असते तर त्यांनी धारावीतील भूखंड घोटाळ्याला स्थगिती दिली असते. भ्रष्टाचाराला मुक्तरान देणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टला आम्ही स्थगिती दिली असती. शक्तीपीठला देखील स्थगिती दिली असते. हा रस्ता महराष्ट्रासाठी नाही, तर अदानीसाठी आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील अदानीसाठी बनतंय. प्रत्येक प्रकल्प अदानीसाठी बनत असेल तर अशा प्रकल्पांना स्थगिती दिली पाहिजेच”, असेही संजय राऊत म्हणाले.

सध्या सरकारकडून वाटण्यात येणाऱ्या मद्य परवान्यांवरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. ” ज्या पद्धतीने मद्य परवाने वाटप झालं आहे. एक एकेका सत्ताधारी मंत्र्याच्या घरात किती मद्य परवाने गेले आहेत ती यादी येईल आता. चोवीस तासात ग्रामीण भागात मद्य परवाने पोहोचले आहेत. सुंदर देशा, दगडांच्या देशा असलेल्या महाराष्ट्राला आता बेवड्यांच्या देशा करायचं सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.